मुंबई - माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे महाविद्यालयाच्या धर्तीवर मूल्यांकन करण्यात येणार असून मूल्यांकनाचा आराखडा निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने एका अभ्यासगटाची बुधवारी नियुक्ती केली. या निर्णयामुळे महाविद्यालयांप्रमाणेच राज्यातील शाळांचीही झाडाझडती होणार, हे आता निश्चित झाले आहे.
राज्यातील शाळांच्या मूल्यांकनाबाबत 16 एप्रिल रोजी प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ, शासकीय अधिकारी, खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ यांची एक बैठक मुंबईत झाली होती. त्यामध्ये शाळा मूल्यांकनासाठी राज्य मूल्यांकन व अधिस्वीकृती संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच मूल्यांकनाचे प्रारूप ठरवण्यासाठी अभ्यास गट आणि कार्यकारी गट नियुक्तीचा निर्णयही झाला होता. त्यानुसार बुधवारी शालेय शिक्षण विभागाने अभ्यास गट आणि कार्यकारी गटाची नियुक्ती केली. अभ्यास गटामध्ये 15 सदस्य असून शिक्षण आयुक्त अध्यक्ष असतील. रयत शिक्षण संस्था (सातारा), शिवाजी शिक्षण संस्था (अमरावती), अंजुमन इस्लाम (मुंबई), सोमलवार शिक्षण संस्था (नागपूर), मराठवाडा शिक्षण संस्था (औरंगाबाद) यांचे प्रतिनिधी अभ्यास गटावर आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन करण्याची पद्धत निश्चित करणे या अभ्यास गटाचे मुख्य काम आहे. एका महिन्याच्या आत अभ्यास गट आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे.