(छायाचित्र- पल्लवी पुरकायस्थ)
मुंबई- पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने मागील सोमवारी सुरक्षा रक्षक सज्जाद मोगलला दोषी ठरवल्यानंतर आज त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
9 ऑगस्ट 2012 मध्ये सज्जादने वकिल असलेल्या पल्लवीची हत्या केली होती. प्रियकर अविक सेनगुप्तासोबत पल्लवी वडाळ्यातील हिमालया हाइटस टॉवरमध्ये राहत होती. नऊ ऑगस्टच्या रात्री सज्जादने पल्लवीच्या घरातील वीजपुरवठा खंडित केला. काही वेळात इलेक्ट्रिशियनसोबत सज्जाद तिच्या घरात गेला. इलेक्ट्रिशियन निघून गेल्यानंतर सज्जादने पल्लवीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने विरोध केल्यानंतर त्याने तीक्ष्ण हत्याराने पल्लवीवर वार करून तिची हत्या केली.
पल्लवीचा पार्टनर सेनगुप्ता याने दिलेल्या माहितीवरून सज्जादला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने अटक केली होती. पल्लवीचे आई- वडिल आयएएस अधिकारी आहेत व दिल्लीत कार्यरत आहेत. पल्लवीच्या हत्याप्रकरणात आरोपी सज्जादला दोषी ठरविल्याने तिच्या आई-वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच सज्जादला फाशीची शिक्षा मिळायला हवी असे म्हटले होते. सज्जादला फाशीची शिक्षा दिली तर तरच समाजात योग्य ते संदेश जाईल असे पल्लवीच्या वडिलांचे म्हणणे होते. मात्र, कोर्टाने त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.