आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Security Wall Works Completing WIthin Time Jayant Patil

संरक्षक भिंतीची कामे वेळेत करणार - जयंत पाटील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वडाळा येथील देवराम दादा चाळीवर दरड कोसळू नये म्हणून सुरू असलेले संरक्षक भिंतीचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.


शुक्रवारी पालकमंत्र्यांनी दरड कोसळलेल्या अ‍ॅन्टॉप हिल भागाची पाहणी करून स्थानिक नागरिकांची भेट घेतली आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या वेळी जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक, महानगरपालिकेचे तसेच पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गुरुवारी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. मृतांच्या वारसांना नियमानुसार सर्व मदत करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले. या भागात दरड कोसळून अपघात होऊ नये म्हणून संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू होते, परंतु काही स्थानिक रहिवाशांनी संरक्षक भिंत बांधण्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देण्यास असहकार्य केले. त्यामुळे सरंक्षक भिंतीचे बांधकाम अपूर्ण राहिले असा मुंबई महापालिकेचा आरोप आहे.


मुंबईतील 25 विधानसभा क्षेत्रात 327 झोपडपट्ट्या दरडप्रवण क्षेत्रात आहेत. दरडी कोसळण्याच्या क्षेत्रात एकूण 22 हजार झोपड्या आहेत. त्यातील 10 हजार झोपड्यांना संरक्षक भिंतीचे संरक्षण आहे.
1992 पासून शासनाने संरक्षक भिंतीसाठी 200 कोटी रुपये खर्च केले. परंतु अद्याप सर्व झोपड्यांना संरक्षक भिंती बांधणे शक्य झालेले नाही.