आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5900 तुकड्यांची वाढ : झेपी शाळांमध्ये सेमी इंग्रजीचा प्रयोग - राजेंद्र दर्डा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील 5900 शाळांतील नवीन तुकड्यांना नुकतीच मान्यता देण्यात आली असून पालकांचा इंग्रजी माध्यमाकडील ओढा पाहता जिल्हा परिषदांच्या शाळांमध्येही सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई महापालिका तसेच खासगी मराठी शाळा बंद पडत असल्याबाबत नितीन सरदेसाई यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. मुंबईतील बंद पडणाºया शाळांचा वापर वाणिज्यिक वापरासाठी केला जात असून एसएससी बोर्डाच्या शाळांचे रूपांतर सीबीएसई अणि आयसीएसई शाळांमध्ये होत असल्याने मराठी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याबाबत आमदार नितीन सरदेसाई आणि एकनाथ खडसे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला. त्यावर दर्डा यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेत 17 प्राथमिक शाळा बंद पडल्या असल्या तरी सात खासगी शाळा सुरू झाल्या आहेत. तसेच मुंबईमध्ये बंद पडणाºया महापालिका आणि खासगी शाळांचा आढावा घेऊ न या शाळांच्या जागांचा वापर वाणिज्यिक वापरासाठी होऊ नये, यासंदर्भात उपाययोजना सुचवण्यासाठी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ सदस्यांची एक समिती नेमण्यात आली आहे.
राज्यभरातील शाळांच्या 5900 तुकड्यांना मान्यता देण्यात आली आहे. तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे ओढा असल्याने पहिलीपासून इंग्रजी विषय सुरू केला आहे तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही सेमी इंग्रजी सुरू करण्याचा विचार असून औरंगाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यात तीन शाळा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्याची माहितीही दर्डा यांनी दिली.