आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांना झालेल्या मानसिक व शारीरिक छळाची चौकशी करण्याचे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाने मुंबई पोलिस आयुक्तांना दिले आहेत. येत्या 10 दिवसांत याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. म्हात्रे यांच्याबाबत प्रसार माध्यमांत आलेल्या बातम्यांची दखल घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाने हे आदेश दिले आहेत. दरम्यान, सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणात आपण लक्ष घातले असल्याचे सांगत हे प्रकरण लवकरच तडीस जाईल असे म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या महिला नेत्या आमदार निलम गो-हे यांनी म्हात्रे यांची भेट घेतली. या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. त्यांनी म्हात्रेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. स्वत: उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात मुंबईतील सर्व महिला नगरसेविकांची भेट घेणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे. त्यापूर्वी उद्धव यांचे सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी म्हात्रे यांची भेट घेऊन चर्चा केली. राजीनामा देऊन काहीही साध्य होणार नाही. पदावरून राहवूनच कोणत्याही मुद्यांवर भाष्य करणे योग्य ठरेल. पक्षनेतृत्त्व तुमच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करणार नाही, असे त्यांनी आश्वासन दिले. त्यानंतर शीतल म्हात्रे यांनी यू-टर्न घेतला व आपण नगरसेवकपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. आपण राजीनामा देण्याची मनस्थितीत पोहोचलो होते. पण उद्धवसाहेबांनी व रश्मीवहिनींनी माझ्याशी बोलून या प्रकरणात लक्ष घालू असे आश्वासन दिल्याचे सांगितले. माझ्याकडे केवळ नगरसेविका हे एकच पद असल्याने या पदावर राहूनच मी लढण्याची तयारी करणार असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दहिसर परिसरातील स्थानिक आमदार विनोद घोसाळकर यांनी आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी एक चौकशी समिती नेमून सविस्तर चौकशी करावी. जर मी दोषी आढळलो तर राजकारणातून संन्यास घेईल, असे घोसाळकर यांनी सांगितले आहे.
शीतल म्हात्रे यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेविका अजंता यादव यांनी दहिसर पोलिसांना निवेदन देऊन घोसाळकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करावी असे म्हटले आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे, की शिवसेनेत महिला नेत्यांना कधीही स्थान नव्हते व असणार नाही. पक्षातील महिलांनी आवाज उठवूनही सेनेच्या नेतृत्त्वाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
पुढे आणखी वाचा, घाडी दांपत्यानेही घोसाळकरांमुळे केला होता सेनेला जय महाराष्ट्र...