आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sena Eyes Race Course Land For Bal Thackeray's Memorial

रेसकोर्सला मुदतवाढ देण्यास शिवसेनेचा विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - घोड्यांच्या शर्यतीसाठी प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी रेसकोर्सला मुदतवाढ द्यायची की नाही, यावरून महापौर आणि क्लब यांच्यात चांगलीच जुंपली आहे. रेसकोर्सचा भाडेकरार 31 मे रोजी संपत असून मुदतवाढीस पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने जोरदार विरोध दर्शवला आहे.

दक्षिण मुंबईत अगदी समुद्रालगत 224 एकर क्षेत्रावर महालक्ष्मी रेसकोर्स आहे. ही जागा महापालिका व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त मालकीची आहे. 1883 मध्ये उभारलेला हा रेसकोर्स 1914 पासून रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबकडे भाडेपट्ट्याने आहे. क्लबचे काही संचालक काँग्रेसच्या नेत्यांचे नातलग आहेत. 31 मे रोजी रेसकोर्सचा 30 वर्षांचा भाडेकरार संपणार असून त्यास मुदतवाढ देऊ नये, असे मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांचे म्हणणे आहे. पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री यांना महापौरांनी तशी पत्रेही पाठवली आहेत.

टर्फ क्बचे संचालक महालक्ष्मी रेसकोर्सचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करत आहेत. सामान्य मुंबईकरांना या रेसकोर्सचा काहीच उपयोग नाही. म्हणून या विस्तीर्ण जागेवर मोठे उद्यान केल्यास शहराचे पर्यावरण राखण्यास मदत होईल, असे प्रभू यांचे म्हणणे आहे.

नावाचे प्रस्ताव कोण आणतात ठाऊक नाही ?
मुंबई महापालिकेने महालक्ष्मी रेसकोर्सच्या भूखंडावर जागतिक दर्जाचे थीम पार्क उभारण्याची योजना आखली आहे. उद्यानाच्या माध्यमातून तेथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा शिवसेना प्रयत्न करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याविषयी पत्रकारांनी विचारले असता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांच्या स्मारकावरून उगाचच कोणी वाद निर्माण करू नये. मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या पत्रकार कक्षाला बाळासाहेबांचे नाव देण्याचाही प्रस्ताव पुढे आला आहे. हे प्रस्ताव कोण आणतात हेच आम्हाला कळत नाही. रेसकोर्सवरील या थीम पार्कमध्येही शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याचा आमचा कोणताही विचार नाही. या ठिकाणी जागतिक दर्जाचे उद्यान उभारावे, असे आमचे मत आहे. या उद्यानाला शिवसेनाप्रमुखांचे नाव दिल्यास त्याचे स्वागतच केले जाईल, असेही ते म्हणाले.

रेसकोर्स हा तर राज्य सरकारचा विषय !
रेसकोर्स येथे थीम पार्क उभारण्याची योजना असून त्याला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याची चर्चा होत आहे. यावर मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले, रेसकोर्सवर जनतेच्या हितासाठी जे आवश्यक आहे ते करणे गरजेचे आहे. मात्र, याबाबतचा निर्णय सरकारच घेऊ शकेल.

भव्य उद्यान व्हावे : प्रभू
मुंबईकरांचा प्रतिनिधी म्हणून रेसकोर्सच्या ठिकाणी भव्य उद्यान व्हावे, असे माझे मत आहे. मुदतवाढीच्या विरोधामागे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचे उद्यान बनवण्याचे कोणताही प्रस्ताव नाही, असे महापौर प्रभू यांनी स्पष्ट केले.