मुंबई - राज्य सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष झाले असले तरी शिवसेना मंत्र्यांनी मानापमानानंतर शपथ घेतल्याने त्यांना पाच डिसेंबर रोजी सत्तेत वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेली कामे जनतेसमोर नेण्याची योजना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना त्यांनी केलेल्या कामांचा अहवाल २७ नोव्हेंबरपर्यंत तयार करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
शिवसेनेचे दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे, डॉ. दीपक सावंत, रवींद्र वायकर, दादाजी भुसे, संजय राठोड, विजय शिवतारे, दीपक केसरकर या दहा मंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शुक्रवार, पाच डिसेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली होती. परंतु शिवसेनेने त्यात म्हणावा तसा सहभाग घेतला नव्हता.
शिवसेनेच्या मंत्र्यांने सांगितले, सत्तेत येऊन आम्हाला एक वर्ष झाले नसल्याने आम्ही शिवसेनेच्या वतीने वर्षपूर्ती कार्यक्रम केला नाही. पाच डिसेंबर रोजी शिवसेनेच्या मंत्र्यांना एक वर्ष पूर्ण होत असल्याने सर्व मंत्र्यांच्या कामांचा एक संयुक्त अहवाल प्रकाशित करून जनतेपर्यंत आपली कामे पोहोचवण्याचे उद्धव ठाकरे यांनी ठरवलेले आहे. यासाठी प्रत्येक मंत्र्याला त्याने एक वर्षात केलेल्या महत्त्वाच्या कामांचा एक अहवाल तयार करून २७ नोव्हेंबरपर्यंत देण्याचे सांगितले आहे. सर्व मंत्र्यांनी अहवाल तयार करण्याचे काम सुरू केलेले आहे.
संयुक्त अहवाल प्रकाशित होणार
प्रत्येक मंत्र्याचा अहवाल पाहून त्यातील महत्त्वाच्या कामांचे संकलन करून एक वेगळा संयुक्त अहवाल तयार करून तो प्रकाशित केला जाणार आहे. केवळ मंत्री म्हणूनच नव्हे, तर पालकमंत्री म्हणून केलेल्या कामांची दखलही या अहवालात घेतली जाणार असल्याची माहितीही या मंत्र्याने दिली. अहवाल तयार करण्याचे काम काही मंत्र्यांनी खासगी व्यक्तींना दिले असून युद्धपातळीवर असा अहवाल २६ नोव्हेंबरपर्यंत तयार करण्यास सांगितले आहे.