आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sena Spokesperson Rahul Narvekar Meets Sharad Pawar News In Marathi

नार्वेकर राष्ट्रवादीच्या वाटेवर, मावळमधून मिळणार उमेदवारी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - खासदार आनंद परांजपे, भाऊसाहेब वाकचौरे, गजानन बाबर यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेतील युवा नेते राहुल नार्वेकर हेही लवकरच पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करणार आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नार्वेकर यांनी रविवारी सकाळी भेट घेतल्यानंतर खुद्द पवारांनीच त्यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिले.

शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या युवा सेनेचे प्रवक्ते आणि कार्यकारिणी सदस्य राहुल नार्वेकर यांनी रविवारी सकाळी सातच्या सुमारास शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. साधारण अर्धा तास चाललेल्या या भेटीच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर हेसुद्धा उपस्थित होते. या वेळी झालेल्या चर्चेत नार्वेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे कळते. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादी भवनात त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

‘आधीपासूनच संपर्कात’
‘राहुल नार्वेकर हे शिवसेनेत अस्वस्थ होते. गेले तीन आठवड्यांपासून ते आमच्या संपर्कात होते,’ अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शिवसेना नेत्यांनी आणि खुद्द नार्वेकर यांनीही आपण शिवसैनिक असून शिवसेनेत राहणार असल्याची ग्वाही दिली होती; पण दोन दिवसांतच यांनी घुमजाव केले व पवारांची भेट घेतली. आता नार्वेकर लवकरच शिवबंधन तोडून हाती ‘घड्याळ’ बांधणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना राष्ट्रवादीतर्फे मावळ लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

राहुल नार्वेकर निंबाळकरांचे जावई
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या राहुल नार्वेकर यांना शिवसेनेतर्फे नुकतीच विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी पक्षाला न कळवता नार्वेकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही त्यांच्या माघारीबद्दल आपण अनभिज्ञ असल्याचे त्या वेळी सांगितले होते. या ऐनवेळच्या माघारीमुळे नार्वेकर शिवसेना सोडणार अशी चर्चा रंगू लागली होती. मूळचे रायगड जिल्ह्यातील असलेले राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष रामराजे निंबाळकरांचे जावई आहेत.