मुंबई- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅरिस्टर अब्दुल रहेमान अंतुले यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. अंतुले मागील महिन्यापासून रूग्णालयातच आहेत. सध्या त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
किडनी निकामी झाल्याने त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू असून ते बेशुद्धावस्थेत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. काँग्रेस नेते अहमद पटेल आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे जनरल सेक्रेटरी मोहन प्रकाश यांनी सोमवारी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली.
आर. आर. पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया- राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावरही ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जबड्याच्या त्रासामुळे त्यांना शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे.