मुंबई - ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य शंकर वैद्य यांचे मंगळवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्यावर काही दिवसांपासून सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर पार्थिवावर दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
'आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातक चोचीने
प्यावा वर्षांऋतु तरी'
अशा एक ना अनेक सुंदर कवितांची पर्वणी देणा-या शंकर वैद्य यांचा जन्म 15 जून 1928 रोजी झाला होता. वैद्य यांना बालपणी निसर्ग सोबतीला होता. त्यामुळे त्यांच्या कवितांमधूनही निसर्गाचे दर्शन मोठ्या प्रमाणावर होत गेले. 'कालस्वर' हा शंकर वैद्य यांचा पहिला काव्य संग्रह होता. त्यानंतर तब्बल 27 वर्षांनी त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. 'दर्शन' हे त्या काव्यसंग्रहाचे नाव. मधल्या 27 वर्षांच्या कालखंडात वैद्य यांनी मासिके, विशेषांक यातून कवितांचे लिखाण सुरू ठेवले होते. काव्यसमारंभांचे सूत्रसंचालनही ते अत्यंत आवडीने करत.
आकाशवाणीवर त्यांच्या काव्य वाचणाच्या कार्यक्रमांनाही श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असायचा. 'आला क्षण, गेला क्षण' हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. वैद्य यांच्या अनेक कवितांना गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आवाजही दिला आहे.