आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Marathi Theature Icon Sudhir Bhatt No More

मराठी रंगभूमीचा \'शो मॅन\' व ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ज्येष्ठ नाट्यनिर्माते व मराठी रंगभूमीचा शो मॅन सुधीर भट यांचे रात्री उशिरा ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रात्री त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना हिंदूजा रूग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथे त्यांची प्राणज्योत मावळली.
आज सकाळी दादरच्या यशवंत नाट्यमंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एका लग्नाची गोष्ट, किरवंत, चार दिवस प्रेमाचे, ती फुलराणी आदी त्यांचे नाटके विशेष गाजली होती. याचबरोबर त्यांनी आपल्या सुयोग नाट्यनिर्मिती संस्थेतर्फे सुमारे 80 नाटकांची निर्मिती केली. याचबरोबर त्यांनी देश-विदेशात शो केले होते. भट यांनी सुमारे 16 हजार प्रयोग केले.
विक्रमवीर नाट्यनिर्माता हरपला- अजित पवार
ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मराठी नाट्यसृष्टीला उर्जितावस्थेत आणून एका नव्या उंचीवर घेऊन जाणारा विक्रमवीर नाट्यनिर्माता आपण गमावला आहे, अशा शब्दात उमपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, सुधीर भट यांनी आपल्या ‘सुयोग’ नाट्यसंस्थेच्या माध्यमातून जवळपास तीन दशकं मराठी माणसाचं नाटकवेड जोपासलं आणि वाढवलं. मराठी नाट्यसृष्टीत हलक्याफुलक्या तसच गंभीर विषयांची त्यांनी यशस्वी हाताळणी केली.
नाटकांच्या सादरीकरणात अभिनव प्रयोग केले. 80 हून अधिक नाटके, 16 हजारांहून अधिक प्रयोग, हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणारी 8 नाटके, देशविदेशात मराठी नाटकांचे प्रयोग, अनेक गुणी कलावंताना प्रोत्साहन अशा कामगिरीतून त्यांनी ‘विक्रमवीर निर्माता’ अशी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. नाट्यकर्मी आणि नाट्यरसिक अशा दोघांचेही लाड पुरवणारा त्यांच्यासारखा निर्माता आता काळाच्या पडद्याआड गेल्याने मराठी नाट्यसृष्टीचं फार मोठं नुकसान झालं आहे.