आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Police Officer Krishna Prakash To Face Police Enquiry

वरिष्‍ठ आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांची होणार चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वरिष्ठ आयपीएस अधिकारी व मुंबईचे अपर पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महानिरीक्षकांमार्फत तीन महिन्यांत चौकशी करणार असल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी विधानसभेत दिली. अहमदनगरचे पोलिस अधीक्षक असताना कृष्णप्रकाश यांनी औरंगाबाद, पुणे आणि नगर जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व शिवाजी कर्डिले यांनी तारांकित प्रश्नावरील चर्चेदरम्यान केला.

एकरी 30 लाख भाव असलेल्या जमिनी कृष्णप्रकाश यांनी केवळ एक लाख रुपये भावाने खरेदी केल्या, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. कृष्णप्रकाश यांनी खरेदी केलेल्या शेतजमिनींची रजिस्ट्री रद्द करण्याची व या प्रकरणाची न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी नाना पटोले यांनी केली. त्यावर या जमिनीची खरेदी किंमत व बाजारभाव यात तफावत आढळल्यास ‘एसीबी’च्या महानिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यामार्फत तीन महिन्यांत चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले.


निलंबनाची मागणी फेटाळली
कृष्णप्रकाश हे उर्मट अधिकारी असून कुख्यात पोलिस अधीक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. तसेच चौकशीवर प्रभाव टाकण्यातदेखील ते माहिर आहेत. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचे निलंबन करणार का, असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. त्यावर ही प्रकरणे ज्या ठिकाणी घडलेली आहेत, तिथे सध्या कृष्णप्रकाश यांची नियुक्ती नसल्यामुळे त्यांचा चौकशीत व्यत्यय येणार नाही, असे सांगत पाटील यांनी निलंबनाची मागणी धुडकावून लावली.