(छायाचित्र: दिलीप शिर्के यांचा मुलगा नितीन व पत्नी पत्रकार परिषदेत बोलताना)
मुंबई- वाकोला पोलिस ठाण्यातील पीआय विलास जोशी आणि एपीआय शिंदे हे माझ्या वडिलांना (दिलीप शिर्केंना) मानसिक त्रास देत होते असा गंभीर आरोप दिलीप शिर्के यांचा मुलगा नितीन याने केला. एपीआय शिंदे हे सतत त्रास देत व त्यांचा पानउतारा करीत होते. ते सहाय्यक फौजदार असतानाही त्यांना पोलिस कॉन्स्टेबलच्या दर्जाची कामे दिली जात होती. याबाबत माझे पती माझ्याशी काही वेळा बोलले होते असे शिर्के यांच्या पत्नीने दावा केला.
मुंबईतील वाकोला पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री सहाय्यक फौजदार असलेल्या दीपक शिर्के यांनी
आपले वरिष्ठ अधिकारी पीआय विलास जोशी व ठाण्यातील ऑपरेटर बाळासाहेब आहिर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यात जोशींच्या छातीवर गोळ्या लागल्या तर आहिर यांच्या पायावर गोळ्या लागल्या. त्यानंतर शिर्के यांनी आपल्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान, उपचारादरम्यान जोशी यांचा मृत्यू झाला तर आहिर यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या गोळीबाराच्या थरारानंतर दिलीप शिर्के यांच्या कुटुंबियांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली.
शिर्के कुटुंबियांनी सांगितले की, मुंबई पोलिस दलाने या घटनेनंतर दिलीप शिर्के यांच्याबाबत जी माहिती दिली गेली ती चुकीची आहे. शिर्के यांना 38 सुट्ट्या दिल्या असे ते सांगत आहेत जे चुकीचे आहे. ते आजारी असल्यामुळे त्यांना त्या सुट्ट्या मिळाल्या होत्या व त्या 28 सुट्ट्या होत्या. त्यानंतर मार्च महिन्यात केवळ 2 सुट्ट्या दिल्या होत्या. त्यानंतरही त्यांना वारंवार सुटट्या दिल्या असे सांगितले जात आहे जे चुकीचे आहे.
दिलीप शिर्के यांना पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी दुय्यम वागणूक देत होते. त्यांचे वय जास्त असूनही त्यांना आरेतुरे केले जाई व अपमानीत केले जायचे. सहाय्यक फौजदार असतानाही त्यांना पोलिस कॉन्स्टेबलची कामे दिली जात होती. पीआय जोशी व एपीआय शिंदे हे शिर्केंना मजूरासारखी वागणूक देत असत. त्यामुळे ते तणावात राहत व निराश होते. त्यांच्यावर उपचार केले होते व काही प्रमाणात सुरु होते. आताच्या घटनेत मुंबई पोलिस दल त्यांनाच खलनायक ठरवत आहे. मात्र, त्यांना दिलेल्या मानसिक त्रासामुळेच शनिवारची घटना घडल्याचे मुलगा नितीन व पत्नीने सांगितले
.
पीआय जोशी व एपीआय शिंदे हे दोघे मिळून त्यांना त्रास द्यायचे. काहीही उठसूट आरोप करायचे. जोशींच्या आधी वाकोला स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पीआय परदेशी यांनीही शिर्के दारू पिऊन ड्युटीवर येतो अशी त्यांची बदनामी केली होती. सर्व वरिष्ठ एकमेंकांना वाचवितात व कनिष्ठांना मात्र कोणीच वाली नसतो त्यामुळे अशा घटना घडतात असे शिर्के कुटुंबियांनी दावा केला.