आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Singer Asha Bhosale Comment On 81 Birthday

मी खरं लिहिलं तर लोकांना त्याचा त्रास होईल-आशा भोसले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेली सुमारे 6 दशके रसिकांना असीम आनंद देणार्‍या शतपैलू, चिरतरुण गायिका आशा भोसले यांचा रविवारी 81 वा वाढदिवस. यानिमित्त ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली. या भेटीत आशाताईंच्या जीवनातील आशा-निराशेचे पैलू उलगडले. यातील पहिली गोष्ट अशी की, सध्या पाककृतीमध्ये रमणार्‍या आशाताई लवकरच मॅँचेस्टरमध्ये नवे रेस्टॉरंट सुरू करत आहेत. दुसरी मनाला चटका लावणारी गोष्ट म्हणजे, आत्मचरित्र लिहिण्याची इच्छा असूनही ते लिहायचे नाही, असे ठरवले. कारण सांगताना आशाताई म्हणाल्या, ‘मी खरं लिहिलं तर लोकांना त्याचा खूप त्रास होईल..’

आपल्या सुरांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा हा आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही. तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफल नाही. त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीतप्रकारही नाही. महाराष्ट्राला लाभलेले हे सुरांचे देणे. जुन्यांसाठी तितकेच जुने, मुरलेले तर नव्यांसाठीही तितकेच नवे आणि ताजे. कधी मनाला धुंद करणारे तर कधी हुरहुर लावणारे. आत्मचरित्र लिहिण्याचा निर्णय रद्द करून त्यांनी अशीच हुरहुर लावली आहे.

अस्सल आवाजाची लेखिका!
आशाताईंना लिहिण्याचाही छंद होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी मराठी आणि हिंदीतून कथा लिहिल्या. ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनाही दाखवल्या. त्यावर तेंडुलकरांनी ‘आशा तू हिंदीतच लिखाण कर’, असे आवर्जून सांगितले. नंतरच्या काळात कविवर्य सुरेश भटांनी आशाताईंना आत्मचरित्र लिहिण्याची खूप गळ घातली. पाठपुरावाही केला. अखेर आत्मचरित्र लिहायला सुरुवात झाली. तेही हिंदीतून. गेल्या वर्षापर्यंत आत्मचरित्राच्या लिखाणाने वेग घेतला होता. मात्र, आता अचानक ते बंद झाले आहे.

आशाताईंनी लिखाण थांबवले आहे. याचे कारण विचारले तेव्हा आशाताई म्हणाल्या, ‘मी खरं बोलणारी बाई आहे आणि जर मी खरं लिहिलं तर लोकांना त्याचा खूप त्रास होईल’. आशाताईंच्या आत्मचरित्राची रसिकांना प्रचंड उत्सुकता होती. मात्र, लिखाण थांबवून त्यांनी चाहत्यांची मोठी निराशाच केली आहे.