आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग मुलांच्या पंचेद्रियांचा पूर्ण विकास व्हावा म्हणून ‘जिद्द’ शाळेने सुरू केले सेन्सरी गार्डन!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चित्तवेधक फुलांचे ताटवे, रंगीबेरंगी फुलझाडे, गुलाब, मोगरा, जाई-जुई अशा विविध फुलांच्या गंधांमुळे पसरलेला मंद सुगंध, भिन्न प्रकारचे आवाज करत किणकिणणाऱ्या घंट्या आणि आपणच प्यादी बनून जाऊ एवढी भली मोठ्ठी सापशिडी...दृष्टी, गंध, चव, स्पर्श व श्रवण या पंचेंद्रियांना उद्दीपित करू शकणारं असं एक अनोखं उद्यान साकारलंय ठाण्याच्या जिद्द स्पेशल स्कूल या दिव्यांग मुलांसाठीच्या शाळेमध्ये.. सर्वसामान्य मुलांप्रमाणेच या मुलांची ज्ञानेंद्रिये विकसित करणे हा या “सेन्सरी गार्डन’चा उद्देश आहे.   

१९८५ मध्ये ठाण्यात जिद्द या शाळेची स्थापना झाली. पुढे २००१ शाळेत मतिमंद विद्यार्थ्यांचे वर्ग आणि २००८ मध्ये बाल मार्गदर्शन  केंद्र सुरू झाले. सध्या या शाळेत ९५ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्यासाठी या शाळेने एक अनोखा प्रयोग केला आहे. या बागेबद्दल ‘दिव्य मराठी’शी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेटे म्हणाल्या की, दिव्यांग मुलांच्या ज्ञानेंद्रियांचे उद्दीपन कठीण असते. ही ज्ञानेंद्रिये उद्दीपित व्हावीत व व्यक्तिमत्त्व विकास व्हावा या उद्देशाने एखाद्या सेन्सरी गार्डनची उभारणी करावी, असे डोक्यात होते. त्यातूनच ठाण्यातील कॅप्रिहान्स नावाच्या कंपनीने त्यांच्या सीएसआर फंडातून असे उद्यान उभारून देण्याची तयारी दर्शवली आणि  हे उद्यान साकारले.   

उद्यानात विशेष काय?  
स्पर्शज्ञानासाठी वॉकिंग ट्रॅक आहे. ट्रॅकचा काही भाग वाळू, लाकडी, विटा, दगड, तर काही भाग गुळगुळीत काचेचा आहे.  पाण्याचा स्पर्श कळावा म्हणून ट्रॅकच्या काही भागात पाण्याचे प्रवाह सोडले. दृष्टी व गंधाचे ज्ञान विकसित करण्यासाठी विविध रंग व सुवासाची फुलझाड- खेळणी आहेत, तर अंकांची अोळख व्हावी यासाठी रंगीबेरंगी सापशिडी आहे. आवाजाच्या ज्ञानासाठी  वेगवेगळ्या घंटा आहेत.
बातम्या आणखी आहेत...