आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत सातमजली इमारत कोसळून सात जण ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सांताक्रूझच्या वाकोला भागात शुक्रवारी सकाळी सातमजली धोकादायक इमारत कोसळून 7 जण ठार झाले. मृतांत श्रीधरन कुटुंबातील सुधा श्रीधरन आणि चाळीतील चंदनबेन पटेल (60) या वृद्धेचा समावेश आहे. 11 जणांना वाचवण्यात ‘एनडीआरएफ’ पथकाला यश आले आहे.

वाकोला भागात न्यू शंकरलोक ही इमारत 1980 मध्ये उभी राहिली. पालिकेने 2007 मध्ये ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली होती. त्यामुळे सर्व रहिवाशांनी इमारत रिकामी केली होती.

अँड. वृंदा श्रीधरन आणि पत्रकार संजय पांडे यांच्या कुटुंबानी मात्र स्थलांतरास नकार दिला होता. श्रीधरन यांनी मुंबई पालिकेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. इमारत पाडण्याबाबत न्यायालयात दावा चालू असल्याने पालिकेने इमारत पाडली नव्हती. इमारतीच्या शेजारी कॅथरीन ही 22 घरांची चाळ आहे. इमारतीचा सर्व मलबा या बैठय़ा चाळीवर कोसळला. त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला.

अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळी मदतकार्य सुरू केले. सायंकाळपर्यंत 7 मृतदेह हाती लागले असून 11 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले होते. पाच जखमींना व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. चंद्रबेन पटेल (60), सुधा र्शीधरन (32), लुईस मॉन्कस (60), सुंदराबाई पारधी (66), आदित्य पारधी (10), आयुष पारधी (7), राजेश पारधी (35) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

आजवरची पडझड
4 एप्रिल 2013 : मुंब्रा येथील लकी कंपाउंड इमारत कोसळून 74 जणांचा मृत्यू
10 जून 2013 : माहीम येथील अल्ताफ मेन्शन इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू
22 जून 2013 : दहिसर येथील पीयूष सोसायटी कोसळून 7 जणांचा मृत्यू
27 सप्टेंबर 2013 : डॉकयार्ड पालिका इमारत कोसळून 61 जणांचा मृत्यू

आकडा वाढण्याची शक्यता
या इमारतीत अवैध बांधकाम सुरू होते. 2007 मध्ये पालिकेने या इमारतीला नोटीस बजावलेली होती. परंतु, र्शीधरन आणि पांडे कुटुंबांनी न्यायालयात जाऊन पालिकेच्या कारवाईला स्थगिती मिळवली होती. या दोन कुटुंबांच्या घर खाली न करण्यामुळे पालिकेला इमारत पाडता आली नाही. त्यामुळे इमारतीशेजारील चाळीतील अनेकांचा मात्र आजच्या घटनेत हकनाक बळी गेला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.