आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Seven Medical Colleges Implementation In State Only On Paper

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील सात वैद्यकीय म‍हाविद्यांची अंमलबजावणी फक्त कागदावरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात सात नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची घोषणा राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी केली होती, त्याला मंजुरीही देण्यात आला. मात्र, अजूनही ही महाविद्यालये पायाभूत सुविधांअभावी सुरूच होऊ शकलेली नाहीत. प्रत्येक महाविद्यालयासाठी मंजूर झालेला 15 कोटी रुपयांचा निधीही सरकारने दुसरीकडे वळवला असल्याचे समोर आले आहे. खुद्द वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनीच याबाबत मंगळवारी कबुली दिली. तीन महाविद्यालये येत्या शैक्षणिक वर्षामध्ये सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे मात्र त्यांनी सांगितले.

मुंबई, अलिबाग, सातारा, चंद्रपूर, बारामती, गोंदिया आणि नंदुरबार या ठिकाणी 100 ते 200 खाटांची वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली होती. त्यापैकी मुंबई, नंदुरबार आणि अलिबाग येथे पायाभूत सुविधा नसल्याच्या त्रुटी दाखवत मेडिकल कौन्सिलने परवानगी नाकारली होती. मंजुरीची मुदत उलटून गेल्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेडिकल कौन्सिल व केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना पत्र लिहिले असून आता गोंदिया, चंद्रपूर आणि बारामती येथे महाविद्यालये उभारण्यास परवानगी द्यावी, अशी शिफारस केली आहे. तसे झाल्यास या महिन्यामध्ये संबंधित ठिकाणी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे अधिकारी तपासणीसाठी येऊ शकतात. मात्र, घोषणा करताना तत्परता दाखवणारे राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मात्र उदासीन असल्याचेच यातून पुढे येते.

मुंबई, नंदुरबारमध्ये अडचणींचे डोंगर
मुंबईमध्ये गोकुळदास तेजपाल रुग्णालयामध्ये महाविद्यालय सुरू करण्याचे निश्चित केले होते. मात्र, मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर काही सरकारी कार्यालये तेथील रिकाम्या इमारतीत हलवण्यात आली. त्यामुळे या वर्षी तरी ते सुरू होऊ शकत नाही, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाच्या एका अधिका-याने दिली. नंदुरबार येथे एमआयडीसीची जागा अद्याप हस्तांतरित केली नसल्याने वैद्यकीय रुग्णालय उभे राहण्यास अडथळे आहेत. तसेच येथे सरकारी रुग्णालय किंवा नर्सिंग महाविद्यालय नसल्याने सुविधा नव्याने उभ्या कराव्या लागणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पायाभूत सुविधा उभारण्यात अडथळे
वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी सांगितले की, सातही महाविद्यालये उभारली नाहीत हे वास्तव आहे. त्यासाठी प्रयोगशाळा, ग्रंथालय, कार्यालय, वर्ग, होस्टेलची सुविधा या काही बाबी पूर्ण कराव्या लागतात. सध्या अलिबाग, चंद्रपूर आणि गोंदिया येथे पायाभूत सुविधा उपलब्ध असून तेथे महाविद्यालये सुरू होऊ शकतात. मान्यता देण्याआधी सुविधा उभारता येत नाहीत कारण त्यांना मान्यता मिळाली नाही तर अडचण येऊ शकते. मात्र, सुविधा उभारण्याबाबत मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला खात्री झाल्यास त्यांना मंजुरी मिळू शकते. या महाविद्यालयांसाठीचा निधी दुसरीकडे वळवावा लागल्याची कबुलीही त्यांनी दिली.