आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seven Thousand Children Away From Education In Mumbai

मुंबईतील सात हजार मुलांची पाटी कोरीच, बृहन्मुंबई पालिकेच्या पाहणीतील माहितीतून स्पष्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दीड कोटी लोकसंख्येच्या स्वप्ननगरी मुंबईत आजही तब्बल सात हजार बालके पाटी पेन्सिलपासून कोसो मैल दूर असल्याचे बृहन्मुंबई महापालिकेने शनिवारी केलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या एका सर्वेक्षणात उघड झाले आहे. सर्वेक्षणात मुंबईत ८ हजार १२६ शाळाबाह्य बालकांची नोंद करण्यात आली अाहे. यामध्ये ४ हजार ४८० मुले आणि ३ हजार ६४६ मुलींचा समावेश आहे. या सर्वेक्षणासाठी पालिकेच्या शिक्षण विभागातील ११ हजार ५८७ शिक्षक आणि २ हजार ५३७ इतर कर्मचारी सहभागी झाले होते.

मुंबई शहरात पालिकेच्या शाळांमध्ये ३ लक्ष ७१ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर शहरातील खासगी शाळांमध्ये ४ लाख ९५ हजार विद्यार्थी शिकतात. दरवर्षी मुंबईत ८३ हजार ९२ विद्यार्थी विविध घरगुती कारणांमुळे अर्ध्यावरच शाळा सोडून देत असल्याचेही पाहणीत आढळले आहे.

मुंबई महापालिका मराठीबरोबरच हिंदी, कन्नड, तेलुगू, गुजराती माध्यमांच्या शाळा चालवते.विद्यार्थी गळती थांबावी म्हणून पालिकेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी पालिका शाळांतील सरसकट सर्व विद्यार्थ्यांना २७ प्रकारच्या शालोपयोगी वस्तू मोफत दिल्या जातात. तसेच बेस्ट आणि रेल्वे पासही पुरवले जातात.शनिवारी झालेल्या सर्वेक्षणात सात हजार शाळाबाह्य बालके शहरात आढळल्याने देशाची आर्थिक राजधानीचा काळा चेहरा पुढे आला आहे.

‘सरल’ची साथ
शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंद केल्यानंतर, त्या परिसरातील शाळेचा संगणक प्रणाली क्रमांक अर्जावर नोंदवला जातो. ८ दिवसात अशा मुलांंना आधारकार्ड क्रमांक देण्यात येईल. त्यानंतर अर्जावर नोंदविलेल्या परिसरातील शाळेत त्या बालकांना दाखल केले जाईल. त्यासाठी ‘सरल’ नावाची खास संगणक प्रणाली बनवण्यात आली आहे.

देवनारमध्ये अधिक गळती
आशिया खंडातील सर्वाधिक मोठा कत्तलखाना असलेल्या देवनार परिसरातील मुलांचे गळतीचे प्रमाण अधिक आहे. तर दहिसर या पश्चिम उपनगरातील विद्यार्थी गळती अत्यल्प असल्याचे या सर्वेक्षणात आढळले आहे.