आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्‍ट्रातील आश्‍चर्य पाहा एबीपी माझावर ‘सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्‍ट्र' मधून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आजवर जगात असलेल्या सात आश्चर्यांनी सर्वांनाच भुरळ घातली आहे. या वास्तूंचे अनेकांना अप्रूप वाटत आले आहे. याच धर्तीवर एबीपी माझा या वृत्तवाहिनीतर्फे महाराष्‍ट्रातील सात आश्चर्ये निवडण्यात येणार आहेत. ‘सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्‍ट्र असे नाव असलेल्या कार्यक्रमाचे ‘दै. दिव्य मराठी’ एक्सक्लुझिव्ह प्रिंट पार्टनर आहे.
‘सेव्हन वंडर्स’ कार्यक्रमासाठी राज्यातील सात वेगळी आश्चर्ये निवडण्यात येणार आहेत. या कामासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतील सात मान्यवरांची ज्युरी म्हणून निवड करण्यात आली आहे.


नेमणूक करण्यात आलेले ज्युरी पहिल्यांदा राज्यातील वेगवेगळ्या 14 कलाकृतींची निवड करतील. त्यानंतर त्या प्रेक्षकांसमोर मांडण्यात येतील. ज्या कलाकृतींना प्रेक्षक भरघोस पसंती देतील, अशी सात आश्चर्ये ‘सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्‍ट्र म्हणून एबीपी माझातर्फे जाहीर करण्यात येणार आहेत.


महाराष्‍ट्राला मोठा नैसर्गिक, ऐतिहासिक, भौगोलिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक वारसा लाभला आहे. त्यामुळे असे वंडर्स निवडून महाराष्‍ट्राच्या वैभवशाली वारशाला मानवंदना करण्याचा हा प्रयत्न असल्याचे एबीपी माझाकडून सांगण्यात आले. www.wondersofmaharashtra.in या संकेतस्थळावर प्रेक्षकांना आपली मते आणि आश्चर्ये मांडता येतील. या उपक्रमाला महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य लाभणार आहे. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या या मोहिमेला महाराष्‍ट्र आणि औरंगाबाद येथून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.