आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seven Years Mehek Become Mumbai's Police Inspector

सातवर्षीय मेहेक बनली मुंबईची पोलिस निरीक्षक !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वार शुक्रवार.. वेळ सकाळी दहाची.. स्थळ : मुंबईतील भोईवाडा पोलिस ठाणे.. सकाळपासूनच प्रत्येक जण नव्या अधिका-याची वाट पाहत होता.. पत्रकार आणि छायाचित्रकारांनीही गर्दी केली होती.. दुपारी बाराचा ठोका पडला अन‌् पोलिस ठाण्याच्या आवारात जीप थांबली.. रुबाबदार पोशाखातल्या नव्या पोलिस अधिकारी त्यातून उतरल्या... खाड् खाड् बुटांचे आवाज झाले आणि छायाचित्रकारांच्या कॅमे-यांचे फ्लॅश लकाकले.. उपस्थित अधिका-यांनी कडक सॅल्यूट ठोकला... सगळ्यांच्या सॅल्यूट्सचा स्वीकार करत मॅडम थेट ठाण्यात शिरल्या आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या खुर्चीत स्थानापन्न झाल्या.. कडक इस्त्री केलेल्या पोलिसी गणवेशातल्या या मॅडम म्हणजे एक सात वर्षांची चिमुकली मेहेक सिंग..
कर्करोगाशी झुंज देणा-या मेहेकची पोलिस अधिकारी बनण्याची प्रबळ इच्छा पूर्ण केली होती ‘मेक अ विश फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने.. एकदा तरी हैदराबादचे पोलिस आयुक्त बनण्याची सादिक या दुर्धर आजाराशी मुकाबला करणा-या १० वर्षीय मुलाची इच्छाही गेल्या वर्षी अशीच पूर्ण करण्यात आली होती.

उत्तर प्रदेशातल्या प्रतापगड जिल्ह्याची रहिवासी असलेली मेहेक सिंग ही मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तिचे वडील दिनेश सिंग इलेक्ट्रिशियन आहेत. मुलीला कर्करोगाने ग्रासले आहे हे जेव्हा कळले तेव्हा सिंग कुटुंबीयांवर आभाळच कोसळले. दीड वर्ष अलाहाबादेत उपचार घेऊनही फारसा फरक पडला नाही. त्यामुळे गेल्या वर्षी तिला मुंबईत आणले. तिची वाचण्याची शक्यता फक्त १० टक्के उरल्याचे डॉक्टर्सनी सांगितले. उद्या मेहेक तिच्या मूळ गावी जाणार आहे. तिने पाहिलेले स्वप्न कदाचित प्रत्यक्षात येणार नाही, पण या प्रसंगाच्या स्मृती आणि पोलिस अंकलच्या आठवणी तिच्या कायम स्मरणात राहतील.
बंदूक हाताळली, तुरुंग पाहिला
मेहेकसाठी खास पोलिसी गणवेश तयार करण्यात आला. तू आज या पोलिस ठाण्याची सर्वेसर्वा आहेस, असे तिला सांगण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील तोंडवळकर यांच्या खुर्चीत तिला बसवण्यात आले. तिने पोलिस ठाण्यात चक्कर मारली. बंदूक हाताळली, तुरुंग पाहिला. काही वेळाने ती गस्तीसाठीही गेली.

दुर्धर आजाराशी सामना
हाडांचा कर्करोग हा दुर्धर आजार आहे. तो का होतो याची निश्चित कारणे नाहीत. हा रोग झालेले फक्त १० टक्केच रुग्ण बरे होतात. त्यातच मेहेकच्या आजाराने चौथी पायरी गाठली आहे. अशा परिस्थितीत एखादा चमत्कारच तिला वाचवू शकतो.
डॉ. श्रीपाद बाणावळे, वैद्यकीय अधिकारी, टाटा रुग्णालय