आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश चोप्रा यांच्यामुळेच करिअर घडले: शाहरुख, शाहरुख खानला यश चोप्रा स्मृती पुरस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मी आज जो कुणी आहे तो केवळ दिवंगत दिग्दर्शक व निर्माते यश चोप्रा यांच्यामुळे. यश चोप्रा यांच्यामुळेच माझे करिअर घडले. मी मुंबईत आलो तेव्हा मला कुटुंब नव्हते, पण आज  माझे कुटुंब खूप मोठे आहे आणि ते जगभर पसरले आहे’, अशी भावना प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याने व्यक्त केली.  
 
शनिवारी रात्री मुंबईत झालेल्या कार्यक्रमात शाहरुख खान याला राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय यश चोप्रा स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, या वेळी तो बोलत होता.  १० लाख रुपये रोख, सुवर्णकंकण असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला सुब्बरामी रेड्डी, पामेला चोप्रा, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, अभिनेत्री रेखा, सिमी गरेवाल, जयाप्रदा, पद्मिनी कोल्हापुरे, खासदार वेणुगोपाल धूत, अनू रंजन, शशी रंजन आदी उपस्थित होते.  
 
शाहरुख म्हणाला, मी मालिकेच्या निमित्ताने मुंबईत आलाे. त्या वेळी मला छोट्या भूमिका मिळाल्या. मात्र, यश चोप्रा यांनी चित्रपट दिल्यानंतर  माझे करिअर घडले. त्यानंतर चोप्रा यांनी मला अनेक चित्रपटांत घेतले. यातील बहुतांश सुपरहिट ठरले. आज मी जे काही आहे ते केवळ चोप्रांमुळेच, असे सांगताना शाहरुखला गहिवरून आले.
 
राज्यपाल म्हणाले, शाहरुख फक्त अभिनय कौशल्यामुळे लोकप्रिय नाही, तर सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनातील वर्तणुकीमुळे लोक त्याच्यावर प्रेम करतात. यश चोप्रा यांनी शाहरुख खानमधील क्षमता खूप आधी ओळखली. सर्वोच्च स्थानावर फार काळ राहणे अवघड गोष्ट असते. मात्र, शाहरुख २५ वर्षांपासून बॉलीवूडवर अधिराज्य गाजवत आहे. देशातील शेवटच्या माणसाला संकटांशी धैर्याने आणि आत्मविश्वासाने लढायला त्याने शिकवले अाहे.’

तरुणांना प्राेत्साहित करावे : राज्यपाल
भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. २०२० मध्ये भारतीयांचे सरासरी वय २९ असेल. तरुणांची ही ताकद राष्ट्र उभारणीसाठी सकारात्मक कार्यात वापरायला हवी. स्वच्छ भारत, बेटी बचाआे, कौशल्य विकास असे अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रम सरकार राबवत असून तरुणांनी त्यात सहभागी व्हावे. बॉलीवूडने तरुणांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात प्रवृत्त करावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...