आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात मनरेगाची जास्त कामे करा, शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुष्काळाची तीव्रता जाणवू लागल्याने बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, परभणी जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर होत असून मनरेगाच्या कामांना प्रचंड मागणी होत आहे. सध्या २६ हजार लाेकांना मनरेगाची कामे मिळत असली तरी आणखी मोठ्या संख्येने कामांची मागणी होत आहे. दुष्काळाची भीषणता आतापासून जाणवू लागल्याने ज्यांच्या हाताला काम नाही, अशा लोकांनी स्थलांतर करायला सुरूवात केली आहे, हे चित्र भयानक आहे. मराठवाड्यात गुरांच्या छावण्या उभाराव्यात अशी मागणी होत असतानाही सरकाकडून अद्याप छावणी उघडण्यात आलेली नाही, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

मराठवाड्याचा तीन दिवसीय दाैरा केल्यानंतर पवारांनी साेमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दुष्काळाची भीषणता त्यांच्या कानावर घातली. उस्मानाबाद, लातूर, बीड, अंबाजोगाईसह महत्वाच्या शहरांत तसेच गावोगावी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. लातूर शहराकसाठी सप्टेंबरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. तसेच उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, हिंगोली व परभणी या शहरांनाही डिसेंबरपर्यंत पुरेल इतकेच पाणी मिळू शकेल. आज मराठवाड्यात १२०० च्यावर टँकर्सद्वारे पाणीपुरवठा हाेत आहे. त्यांची संख्या वाढवावी, अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली.

मराठवाडयात पीक परिस्थिती अत्यंत वाईट असून अनेक ठिकाणी पेरणी झाली नाही. जेथे पेरणी झाली तेथे उगवण झाली नाही. उभी पिकेही करपून नष्ट हाेत अाहेत. दुबार पेरणी होऊनही हाती काही लागले नाही. शेतकऱ्यांना याबाबतीत तातडीने दिलासा देणे गरजेचे आहे. मराठवाडयातील फळबागा पुन्हा एकदा संकटात सापडल्या असून त्या वाचविण्यासाठी सरकारने वेगळा कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे, असे पवार यांनी सांगितले. मराठवाडयाशिवाय नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सांगली आणि पुणे या जिल्हयांतील अवर्षण प्रवण भागात देखील हीच परिस्थिती दिसून येत असल्याचे पवार म्हणाले.
सूचनांचा विचार करू
शरद पवार यांनी खूप चांगल्या सूचना केल्या आहेत. या सूचनांचा सरकार निश्चितच विचार करून लवकरच दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी अाणखी आश्वासक पावले उचलणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्राकडूनही अपेक्षा
संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडेही मागणी करणार आहोत. केंद्रीय पथक नुकतेच मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. ते त्यामुळे केंद्राकडूनही मोठ्या मदतीची अपेक्षा आहे, असे पवार म्हणाले.

मोदी सरकार शेतीप्रश्नी गंभीर नाही : राजू शेट्टी
नरेंद्र मोदी शेतीला बरे दिवस आणतील, शेतमालाला भाव देतील, या आशेने शेतकऱ्यांनी भाजपला मतदान केले. मात्र मोदी सरकारने कांद्याचे निर्यात मूल्य वाढवणे, साखर निर्यात ठप्प करणे आणि भूसंपादन विधेयकात मनमानी करण्यात धन्यता मानली. केंद्रातले भाजपा सरकार शेतीप्रश्नाबाबत गंभीर नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला. मुंबई मराठी पत्रकारसंघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. कांद्याच्या निर्यात मूल्यात वाढ करण्याची काहीच गरज नव्हती. परंतु शहरातल्या लोकांना स्वस्तात कांदा मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारने चुकीचा निर्णय घेतला. भूसंपादन विधेयकामध्ये बदल करुन शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगांच्या घशात घालण्याचा प्रयत्न पूर्णत: शेतकरीविरोधी होता असे शेट्टी यांनी यावेळी सांगितले.