मुंबई - बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यात राज्यातील आघाडीसंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. केवळ काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी तसेच अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादीने उठवलेली ही निव्वळ हूल आहे, असा दावा बसपचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
‘गेले दोन दिवस राष्ट्रवादी आणि बसप यांच्यातील आघाडीसंदर्भात अनेक बातम्या चर्चेत आहेत. तसेच शरद पवार आणि मायावती यांच्यात भेट झाल्याचे तसेच राज्यातील आघाडीसंदर्भात बोलणी झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये काडीचेही तथ्य नाही. या बातम्या राष्ट्रवादी पक्षाकडून जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत’, असे गरुड यांनी स्पष्ट केले.
स्वबळावर लढणार : वीरसिंह
‘बसप राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षांशी आघाडी करणार नाही. महाराष्ट्रात 288 जागा स्वबळावर लढवण्याचा बसपचा निर्धार या वेळी कायम आहे. माझे आजच मायावती यांच्याशी बोलणे झाले. शरद पवार यांच्याशी मायावती यांची चर्चा झाल्याचे वृत्त निराधार असून कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये’, असे बसपचे महाराष्ट्र प्रभारी खासदार वीरसिंह पत्रकार परिषदेत म्हणाले.