आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी शरद पवारांची बिनविरोध फेरनिवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवारांची पक्षाध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड झाल्यानंतर स्वागत करताना.... - Divya Marathi
शरद पवारांची पक्षाध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड झाल्यानंतर स्वागत करताना....
पाटणा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. पाटण्यात सुरू असलेल्या पक्षाच्या 6 व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाचे सरचिटणीस व निवडणूक अधिकारी टी. पी. टी. पी. पिथाम्बरन मास्टर यांनी जाहीर केले. 1999 मध्ये काँग्रेस पक्षातून बाहेर पडत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. तेव्हापासून शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षाचे 6 वे राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. दोन दिवसीय अधिवेशनाचा आज दुसरा आहे. आज सकाळी पाटण्यातील नॉर्थ गांधी मैदानावरील श्रीकृष्ण मेमोरियल हॉल येथे पक्षाचे अध्यक्ष पवारांचे आगमन होताच त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अधिवेशनातील समारोपाच्या भाषणातील मुद्दे...
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित असणाऱ्या सर्वांचे स्वागत आणि अभिनंदन करतो. या अधिवेशनाची सुरुवात करताना आर. आर. पाटील, जे आपल्या पक्षातील निष्ठावान आणि मोठा जनाधार असलेले नेते होते त्यांचे स्मरण करतो. महाराष्ट्र तसेच देशात एनसीपी या पक्षाला मजबूत करण्यातील आर. आर. पाटील यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही.
- राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना युवा, महिला, अल्पसंख्याक, समाजातील दुर्लक्षित घटक दलित तसेच आदिवासी समाजाच्या रक्षणासाठी आणि विकासासाठी झाली आहे, याचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. देशाच्या मतदारांनी आपल्याला विरोधी पक्षाची नवीन जबाबदारी दिली आहे. गेली 10 वर्षे केंद्रात आणि 15 वर्ष महाराष्ट्रात सत्तेत राहिल्यानंतर आता विरोधी पक्षाची भूमिका आपल्याला पार पाडायची आहे. गेल्या वर्षभरात आपण सक्षमपणे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली.
- सरकारने जनतेच्या हितासाठी जे निर्णय घेतले, त्यांचे आम्ही स्वागत केले. परंतु जे निर्णय लोकांच्या हिताविरोधात घेतले गेले, त्यांना कडाडून विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला आणि भविष्यातही हा पक्ष तो करत राहील. अच्छे दिन आयेंगे असं सांगितलं, पण सामान्य माणसाच्या जवळपास कुठेही अच्छे दिन आलेले नाहीत.
- मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी स्वत: शेतकरी आहे, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळेच केंद्रात कृषिमंत्री होतो. त्यामुळे शेतकरी, गाव आणि शेती यांना माझ्या राजकारणात नेहमीच प्राधान्य राहील. सध्या साखर, दूध या व्यवसायात खूप चिंता आहे. सरकारने ठरवून दिलेला एफआरपी दर देणं साखर कारखान्यांना शक्य नाही कारण विक्री दराची तफावत 800 रुपये प्रतिक्विंटल आहे. अशा परिस्थितीत साखर उद्योगाचं अस्तित्व टिकवणं कठीण आहे. देशाचे पंतप्रधान मन की बात करतात. पण कधीही सामान्य लोकांचे हाल त्यांना सांगितले नाहीत. वर्षाच्या सुरुवातीच्या 35 दिवसांत फक्त मराठवाड्यातच 93 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, याची त्यांना माहिती नाही का? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या आकडेवारीत फेरफार करून, आत्महत्या केलेले शेतकरी नव्हते हे दाखविण्याचा प्रयत्न सरकार करते आहे. देश आज कृषी संकटात असताना, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना शेती वाचवणं म्हणजे देश वाचविण्यासारखंच आहे हे मोदी सरकारला मान्य नाही.

- घरवापसी, लव जिहाद यासारखे अनुचित प्रकार देशात घडत आहेत. आपसात द्वेष निर्माण केला जातो आहे. पण सर्वधर्मसमभावायाशिवाय भारताचा विकास शक्य नाही.

- महाराष्ट्रात आघाडी न झाल्याने दोन्ही काँग्रेस पक्षाचे नुकसान झालं. महिला आरक्षण विधेयक संसदेत पारित व्हायला हवं. नाही तर महिला कधीही पुढे येऊ शकणार नाहीत. अंधश्रद्धा ही समाजाच्या विकासासाठी बाधक आहे. बिहारची जनता देशाची परिस्थिती पाहून सांप्रदायिक शक्तींना दूर ठेवण्यासाठी निश्चितच बदल करेल असा मला विश्वास आहे.
पुढे छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा, राष्ट्रवादीचे 6 वे राष्ट्रीय अधिवेशन...
बातम्या आणखी आहेत...