आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Asks Partymen To Correct Mistakes, Not Lose Heart

शरद पवारांनी काढला सामूहिक नेतृत्वाचा सावध सत्तामार्ग!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव जाहीर करावे, या कार्यकर्त्यांच्या मागणीला खो देत पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रात भाजपकडे आता लोकनेताच नसल्याने राष्ट्रवादीला चांगले दिवस असल्याची आशाही त्यांनी कार्यकर्त्यांना दाखवली. नेते-कार्यकर्त्यांनी आता जनतेशी संपर्क वाढवावा, अशा शब्दांत त्यांनी कानही फुंकले.

राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेच्या 15 व्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित बैठकीत पवारांनी सर्वच प्रमुख मुद्दय़ांवर भाष्य केले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची मीमांसा करताना त्यांनी नेत्यांचे कानही उपटले. पवार म्हणाले, ‘पक्षाचा कार्यकर्ता आणि जनतेचा संपर्क तुटला आहे. त्याचबरोबर कार्यकर्ता आणि नेत्यांमधले अंतरही वाढल्यामुळेच लोकसभेत पक्षाचा पराभव झाला.’

प्रचार मोहीम फलकाचे अनावरण
कार्यक्रमात राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार मोहीम फलकाचे अनावरण केले. प्रचारात प्रत्येक वेळी व्यासपीठावर फलक असेल. ‘ताकद महाराष्ट्राची, प्रत्येक माणसाची’ असे ब्रीद आणि फक्त शरद पवारांची छबी यावर असेल. या कार्यक्रमात ‘महाराष्ट्रा तुला मुजरा राष्ट्रवादी’चा या नव्या कोर्‍या राष्ट्रवादी गीताचेही सादरीकरण झाले. हे गीत ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी लिहिले असून संगीत व आवाज अवधूत गुप्ते यांचा आहे.

राज्यात मोदी असणार नाहीत..!
मोदींकडे बघून लोकांनी केंद्रात सत्ता दिली. मात्र, राज्यात मोदी असणार नाहीत. त्यामुळे जे काही चार-पाच लोक सत्तेची स्वप्ने बघताहेत, त्यांच्यावर जनता विश्वास ठेवणार नाही. मुंडेंचा उल्लेख करताना ते म्हणाले की,‘एक जण सत्ता यावी म्हणून धडपडत होता. काही करू पाहत होता. दुर्दैवाने त्याचे निधन झाले.’

नेत्यांच्या मुजोरपणावर बोट
लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करताना पक्षातल्या नेत्यांच्या मुजोर व पंचतारांकित कार्यपद्धतीवरही पवारांनी नेमकेपणाने बोट ठेवले. ‘आपण अनेक विकासकामे केली, पण तेवढय़ावरच भागत नाही. विकासात लोकांना माणुसकीचा चेहरा दिसला पाहिजे. लोक म्हणतात विकास करायलाच तर तुला पाठवले आहे.

आत्मस्तुती नको, आत्मचिंतन हवे
सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भाषणाच्या अभिनव उपक्रमात सर्वांनी पवारांचीच स्तुती चालवली. त्यामुळे संतापलेल्या एका कार्यकर्त्यांने गॅलरीतून खडे बोल सुनावले. तो म्हणाला, ‘पराभवानंतर आम्हाला आत्मस्तुती नको, आत्मचिंतन हवे आहे. एक कार्यकर्ता म्हणून हे सांगण्याचा मला अधिकार आहे.’

केंद्रावर टीका : दिल्लीची सत्ता बदलली आणि राज्यात सांप्रदायिक ज्वर चढू लागला असल्याची टीका पवारांनी केली. आहे. या सत्ताबदलामुळे भीतीची चाहूल अल्पसंख्याकांना लागली असल्याचे सांगून काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित महापुरुषांबाबत आक्षेपार्ह मजकुरावरून निर्माण झालेल्या जातीय तणावाकडे त्यांनी लक्ष वेधले.

.. नाही तर लोक आपल्याला दुरुस्त करतील
लोकसभेतील पराभवामुळे आता आपल्याला कार्यपद्धती दुरुस्त करावी लागेल. नाही तर लोक आपल्याला दुरुस्त करतील. पुन्हा लोकांवर आपल्याला दुरुस्त करण्याची वेळ आणू नका, असा इशाराही पवारांनी नेत्यांना दिला.

शरद पवार म्हणाले..
- 15 वर्षे सत्ता उपभोगल्यावर आमचा जनतेशी संवाद तुटला आहे. नेते आणि कार्यकर्त्यांत दुरावा निर्माण झाला आहे.
- कार्यकर्ता फार काही मागत नाही. त्याचे म्हणणे एवढेच की, कधी गाडीतून तुम्ही जात असताना आम्ही दिसलो तर गाडी थांबवा. शक्य झालंच तर काच खाली करा. खाली उतरून आमच्याशी बोला.
- सर्वसामान्य लोकांसमोर आपली इज्जत ठेवावी,एवढीच कार्यकर्त्याची माफक अपेक्षा असते, असे पवारांनी म्हणताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

गोविंदराव आदिकांच्या गैरहजेरीमुळे चर्चेला ऊत
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम असूनही पक्षाचे सरचिटणीस गोविंदराव आदिक गैरहजर राहिल्याने कार्यकर्त्यांत त्यांच्या नाराजीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आदिक बाहेर पडून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही कार्यकर्ते बोलत होते.