आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीतील भ्रष्टाचारी मंत्री भाजपमध्ये साधूसंत कसे झाले?- पवारांचा भाजपला सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राष्ट्रवादीतील ज्या आमच्या दोन मंत्र्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप तुम्ही केले. विधानसभेचे कामकाज तीन-तीन दिवस बंद पाडले. त्याची दखल घेऊन आम्ही त्यांना बाहेर काढले आणि सत्तेसाठी तेच लोक तुमच्याकडे आल्यावर ते साधू संत कसे वाटले? असा सवाल उपस्थित करीत शरद पवारांनी भाजपवर टीका करण्याचा सपाटा कायम ठेवला आहे.
नाशकातील सटाण्यातील प्रचारसभेत पवार बोलत होते. पवार म्हणाले, भाजप दुतोंडी भूमिका घेणारा पक्ष आहे. एका बाजूने भ्रष्टाचाराच्याविरोधात बोलायचे. गुन्हेगारीवर बोलायचे आणि अशाच प्रकारच्या नेत्यांना आपल्या पक्षात घ्यायचे व सत्तेची पोळी भाजण्याचा प्रयत्न करायचा. हे झाले सत्तेचे पण मोदी सरकारने तरी एवढी आश्वासन देऊन काय दिवे लावले असा सवाल उपस्थित करून पवार पुढे म्हणाले, यूपीए सरकार असताना भाजपच्या खासदारांनी कांदा निर्यात थांबवण्याची मागणी केली होती. मात्र, निर्यात थांबविली तर कांदा उत्पादक जिरायती शेतकरी उद्‌ध्वस्त होईल, हे मला ठाऊक असल्याने ही मागणी मी फेटाळून लावली. कारण यामुळे शेतक-यांचे नुकसान होणार हे अटळ असल्याने मी शेतकऱ्यांच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिलो.
आज या भाजप सरकारने जीवनावश्ययक वस्तूंमध्ये कांद्याला टाकले आणि त्याची किंमत, निर्यात धोरण, साठ्याचे धोरण ठरवण्याचा अधिकार शासनाने आपल्याकडे घेतला. शेतीमालाच्या निर्यातबंदीमुळे भाव पाडले जातात. अशाने शेतकऱ्यांचे मुद्दल तरी वसूल होईल का? हे सर्व निर्णय शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहेत. मोदी सरकारचे धोरण हे शेतकरी आणि शेतीची अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त करणारी आहे, अशी टीका पवारांनी मोदी सरकारवर केली.