आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाेटाबंदीमुळे सर्वसामान्यांचे हाल, काळे पैसेवाले सुखात - शरद पवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयाने शेतकऱ्यांच्या हाती पैसा उरला नसून शेतमालाला उठाव नाही, गुजरातमध्ये शेतकऱ्यांना दूध रस्त्यावर ओतून द्यावे लागत अाहे. कष्ट करून बचत केलेल्या सर्वसामान्यांचे नोटबंदीने मोठे हाल होत असून काळे पैसेवाले मात्र सुखात आहेत, असा गंभीर आरोप करत माेदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत वेदनादायी ठरला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

घाटकोपरमध्ये रविवारी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यावेळी झालेल्या सभेत पवार बोलत होते. पवार म्हणाले, देशात एकूण १७ लाख कोटी चलन आहे, नोटबंदीच्या िनर्णयाने त्यातील ८६ टक्के खऱ्या नोटा बाद झाल्या आहेत, एटीमच्या आकारात नोटा छापल्या नाहीत, परिणामी लोकांना नोटा बदलून घेण्यासाठी रांगा लावाव्या लागल्या, त्यामध्ये ७१ लोकांचे हकनाक बळी गेले, तरीही नोटबंदीच्या निर्णयाने लोक खुश असल्याचे भाजपवाले खोटे सांगत अाहेत, असा आरोप पवार यांनी केला.

मुंबई- अहमदाबाद या बुलेट ट्रेनसाठी पंतप्रधान ९८ हजार कोटींचा चुराडा करायला िनघाले आहेत, इतक्या पैशात कोलकाता ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई आणि दिल्ली ते चेन्नई हेे तिन्ही रेल्वे मार्ग वेगवान करता येतील. मुंबई उपनगरीय लोकलसाठी आठ हजार कोटींची गुंतवणूक केल्यास ८० लाख मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होईल, मात्र यात केंद्राला अजिबात स्वारस्य नसल्याचा टोला पवारांनी लगावला.

माेदींनी देशाचे प्रतिनिधीत्व करावे
पंतप्रधान मोदी जेव्हा परदेशी दौऱ्यावर जातात, तेव्हा अनिवासी भारतीयांच्या सभेत भारताच्या माजी पंतप्रधानांवर टीका करतात, ही एकप्रकारे देशाची बदनामी आहे, असे सांगत मोदींनी भाजपचा नव्हे तर देशाचा प्रतिनिधी म्हणून परदेशात बोलावे, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली. या मुद्द्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अायुष्यातील काही घटनांचे उदाहरण देऊन पवारांनी त्यांचे काैतुकही केले.

दरम्यान, माेदी सरकारने घेतलेल्या नाेटाबंदीच्या निर्णयाचे यापूर्वी काैतुक करणाऱ्या पवारांनी रविवारच्या सभेत मात्र या निर्णयावर टीका केली. ‘नोटबंदीच्या निर्णयाचा आगामी िनवडणुकीत भाजपला माेठ्या प्रमाणावर फटका बसेल’, असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले. जे विरोधक नोटबंदीच्या निर्णयावर टीका करतात, त्यांना भाजपवाले काळे पैसेवाले म्हणतात, असे सांगून सर्व विरोधकांना तुम्ही देशविरोधी ठरवणार का, असा सवाल त्यांनी भाषणात उपस्थित केला. दरम्यान, माजी मंत्री सचिन अहिर, जितेंद्र अाव्हाड यांनीही यावेळी राज्य व केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.

ममता, इंदिराजींचे पवारांकडून काैतुक
‘नोटबंदीच्या निर्णयाविरोधात दिल्लीत मोर्चा काढणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रामाणिक नेत्या आहेत. मोदींनी ममतांवर टीका करायला नको होती, पंतप्रधान जर एखाद्या मुख्यमंत्र्यावर टीका करायला लागले तर केंद्र-राज्य संबंध राहतील का?’, असा प्रश्न पवारांनी विचारला. इंदिरा गांधींचा आपल्याला अभिमान असल्याचे गाैरवाेद‌्गारही त्यांनी काढले.

पुढे वाचा, नोटाबंदी फसली तर पुन्हा ‘रामलीला’ गाठणार : अण्णा
बातम्या आणखी आहेत...