आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलवार म्यान : पवार पंकजांच्या पाठीशी, चिक्की प्रकरणातून सहीसलामत सुटणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महिला व बालकल्याण विभागात २०६ कोटींंच्या घाेटाळ्याप्रकरणी विराेधक मंत्री पंकजा मुंडे यांना पावसाळी अधिवेशनात चांगलाच जाब विचारणार असे चित्र रंगवले जात असले तरी प्रत्यक्षात वास्तव मात्र वेगळेच अाहे. भाजप, शिवसेना नेत्यांपाठाेपाठ अाता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही अप्रत्यक्षपणे पंकजांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली अाहे. त्यानुसारच हे प्रकरण फार न ताणण्याची तंबी अापल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पंकजा यांचे बंधू व विधान परिषदेतील विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीच सर्वप्रथम याप्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली हाेती. मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. या प्रकरणाला भाऊबंदकीचा वास येऊ नये म्हणून मग धनंजय यांनी या प्रकरणाची कागदपत्रे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडे पुरवली. त्यानंतर सावंत यांनी ‘एसीबी’कडे तक्रार दाखल केली व राज्याच्या राजकारणात अाराेपांची धुळवड उडाली. या अाराेपांचे खंडन करताना स्वत: पंकजा व मुख्यमंत्र्यांना बरीच कसरत करावी लागली. दरम्यान, काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या कथित घाेटाळ्याविराेधात राज्यभर अांदाेलन सुरू केले असले तरी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मात्र त्यावर जाहीर भाष्य केले नव्हते. याउलट ‘पंकजा माझ्या दृष्टीने छाेट्या अाहेत, त्यावर मी बाेलणार नाही,’ असे अाैरंगाबादेत सांगत पवारांनी या विषयात अापल्याला स्वारस्य नसल्याचे दाखवले हाेते. दुसरीकडे, पवारांनी दोन्ही सभागृहांतील अापल्या पक्षाच्या नेत्यांना चिक्की प्रकरणाचा फार गाजावाजा करू नका, असे स्पष्टपणे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सेनेचीही हाताची घडी, तोंडावर बोट
शिववसेनेला चिक्की प्रकरणाची नीट माहिती आहे. मुख्यमंत्री तसेच पंकजा मुंडे यांची या प्रकरणात काय भूमिका आहे, याविषयी शिवसेना नेते खासगीत चवीने चर्चा करतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंकजांवरील आरोप गंभीर असल्याचे म्हटले असले तरी तशी भूमिका ते उघडपणे मांडू शकणार नाहीत. यामुळे शिवसेनेचीही हाताची घडी, ताेंडावर बोट असल्याचे दिसते. एकूणच या प्रकरणातील पंकजा मुंडे यांच्या सुटकेचा मार्ग सोपा होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

पवारांच्या माैनाचे कारण काय?
- मराठवाड्यात राष्ट्रवादीला पाया भक्कम करायचा अाहे. धनंजय विरुद्ध पंकजा वाद उदभवल्यास पुन्हा पंकजा यांच्या बाजूनेच सहानुभूतीची लाट जाऊ शकते.
- पवारांच्या अादेशामुळे धनंजय मुंडे, तटकरे, अजित पवार यासारखे नेते गप्प अाहेत. तर याविषयावर आंदोलन करू नका, असेही या नेत्यांना बजावण्यात आल्याचे कळते.
- विधानसभेत विरोधकांकडे फारसे संख्याबळ नाही. त्यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आक्रमपणपणे हा विषय मांडतील, अशी शक्यता नाही आणि त्यांना राष्ट्रवादीकडून फारसा पाठिंबा मिळणार नाही. परिषदेत राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. तटकरे, मुंडे यांच्यासह अमरसिंह पंडित, विद्या चव्हाण यांच्यात प्रकरण ताणून धरण्याची ताकद होती. मात्र आता पक्षश्रेष्ठींकडूनच शांत राहण्याचे आदेश दिल्यानंतर अाता त्यांचाही नाईलाज अाहे.