आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियांच्या त्या \'चौकडी\'ने मला पंतप्रधानपदापासून रोखले- शरद पवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 1991 साली राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीनंतर मला पंतप्रधान होण्यापासून सोनिया गांधींच्या विश्वासू चार नेत्यांनी रोखले असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे.
शरद पवार यांच्या 'ऑन माय टर्म्स' या राजकीय आत्मकथनाचे प्रकाशन राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी (10 डिसेंबर रोजी) नवी दिल्लीत झाले. या पुस्तकात पवारांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 1991 साली राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पवारांना पंतप्रधानपदाची संधी होती असे आजपर्यंत बोलले जात होते. मात्र, यावर पवारांनीच आपल्या पुस्तकात भाष्य केले आहे.
पवारांनी या पुस्तकात दावा केला आहे की, राजीव यांच्या हत्येनंतर काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याइतपत संख्याबळ मिळाले होते. त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांच्या ऐकण्यातील पंतप्रधान हवा होता. स्वतंत्र विचाराने काम करणारा पंतप्रधान त्यांना नको होता. त्यामुळे '10 जनपथ'वर घुटमळणा-या तथाकथित निष्ठावंतांच्या चौकडीने माझ्या नावाला विरोध केला. अर्जून सिंग, व्ही. जॉर्ज, एम.एल. फोतेदार, आर. के. धवन यांनी वार्धक्याकडे झुकलेल्या पी. व्ही. नरसिंहराव यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सोनियांना सांगितले. शरद पवार पंतप्रधान झाल्यास ते देशावर दीर्घकाळ अधिसत्ता गाजवत राहतील तसेच पवारांचे वय कमी असल्यामुळे गांधी घराण्याच्या हिताला मारक ठरेल अशी भीती या चौकडीने सोनियांना घातली. 'वो लंबी रेस का घोडा है' असा प्रचार करून पवारांपेक्षा नरसिंह राव बरे असे सोनियांच्या मनावब बिंबलले असा दावा पवारांनी पुस्तकात केला आहे.
नरसिंह राव यांना पंतप्रधान करण्यामागे अर्जून सिंग यांचे काही आडाखे होते असा दावा करून पवारांनी पुढे पुस्तकात म्हटले आहे की, नरसिंह राव हे वार्धक्य आणि प्रकृति अस्वास्थ्यामुळे मुख्य राजकीय प्रवाहातून निवडणुकीआधीच बाहेर पडलेले होते. तरीही पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर प्रदीर्घ अनुभवाचा मुद्दा पुढे करून नरसिंह राव यांना परत आणण्यात आले. यामागे अर्जुन सिंगांची खेळी होती. अर्जुन सिंग हे स्वत: पंतप्रधानपदासाठी इच्छुक होते, पण त्यांना खासदारांचा पाठिंबा नव्हता. त्यामुळे राव यांचे वय आणि तब्येत पाहता त्यांच्यानंतर पंतप्रधानपद आपल्यालाच मिळेल असे आडाखे अर्जुन सिंग यांनी बांधले होते. त्यामुळे माझ्या तुलनेत नरसिंह रावांना पसंती देण्यासाठी सोनिया गांधी यांचे मन वळविण्याची ‘चाणाक्ष खेळी’ केली. अर्जुन सिंग, व्ही. जॉर्ज, एम. एल. फोतेदार, आर. के. धवन या चौकडीने नरसिंह रावांना पुन्हा राजकारणात आणून पंतप्रधानपदावर विराजमान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे पवारांनी पुस्तकात म्हटले आहे.
याबाबत सांगितले जाते की, 1991 च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने अडीचशेच्या घरात जागा जिंकल्यानंतर शरद पवार पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये होते. पवारांनी सुरेश कलमाडीसारख्या नेत्याला हाताला धरून दिल्लीत लॉबिंग सुरु केले होते. मात्र, गांधी घराण्याचे कायमच विरोधक मानले गेलेल्या पवारांना पंतप्रधानपद बनण्यापासून काँग्रेसमधील गांधी घराण्याशी जवळिक असलेल्या नेत्यांनी रोखले होते.
बातम्या आणखी आहेत...