आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने सरकार पाडल्यास भाजपला पाठिंबा नाही: शरद पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देणार नाही. तसे लेखी पत्र राज्यपालांना देण्याची आमची  तयारी आहे. मात्र, सरकारचा पाठिंबा काढणार, अशी हवा करणाऱ्या शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांनीही तसे लेखी पत्र राज्यपालांकडे द्यावे, अशी गुगली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टाकली.   
 
नरिमन पॉइंटच्या  राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी बोलताना पवार यांनी शिवसेनेच्या अस्मितेला आव्हान देण्याचा जोरदार  प्रयत्न केला. सध्या शिवसेना व भाजपचे नेते ज्या पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप करत आहेत ते पाहता सरकार कधीही अस्थिर होऊ शकते.
 
सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा करीत असतानाच उत्तर प्रदेश  निवडणुकीतील भाजपने शेतकऱ्यांना  संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे, तशी कर्जमाफी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिली तरच राज्यातील सरकार पाच वर्षे चालू शकते, असे शिवसेना सांगत आहे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याची नुसतीच हवा करत आहे. त्यांनी आधी बाहेर पडल्याचे पत्र राज्यपालांना द्यावे, आम्ही पाठिंबा देणार नसल्याचे पत्र देऊ, असे पवार म्हणाले.
 
भाजपकडून पैसा व सत्तेचा गैरवापर: सध्या राज्यातील निवडणुकांत भाजपकडून मोठ्या प्रमाणावर सत्ता आणि पैशाचा गैरवापर सुरू आहे. भाजपच्या जाहिराती व होर्डिंग्जचा भडिमार पाहता कोट्यवधी रुपये प्रचारासाठी वापरल्याचे स्पष्ट दिसते. नोटबंदीनंतर एवढ्या कमी काळात जाहिरातींसाठी एवढा पैसा कोठून आणला, याचे उत्तर भाजपला द्यावे लागेल. जे लोक पारदर्शकतेबद्दल जोरकस भूमिका मांडत असतात त्यांच्याकडून याबाबत तत्काळ खुलासा गरजेचा आहे, असे पवार म्हणाले.

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हवा: राज्यात महापालिकांसोबत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीचा अंदाज पाहता व सरकारच्या धोरणांविरोधात जनतेची नाराजी पाहता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनमत कौल जाईल, असे वातावरण  आहे. राज्यातील जनमत दोन वर्षांत सत्ताधाऱ्यांना वैतागले, असे पवार  म्हणाले.
 
शेतकऱ्यांना कर्जमाफी हाच एकमेव पर्याय: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने तेथील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. राज्यात भाजपला सरकार वाचवायचे असेल तर उत्तर प्रदेशप्रमाणेच राज्यातही संपूर्ण कर्जमाफी करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र सरकार घालविण्यापेक्षा  पुन्हा निवडणुकीवर व जाहिरातींवर हजारो कोटींचा खर्च करण्यापेक्षा आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या  प्रकृतीचा विचार करता शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे केव्हाही चांगले, असा टोला पवारांनी मारला.
 
नोटबंदीचा शेतीला मोठा फटका: पवार म्हणाले, नोटबंदीमुळे लाखो लोक बेरोजगार झाले.राज्यात पॉवरलूम सेक्टरमधून हजारो लोक आपल्या मूळ गावी परतले आहेत. शेती व छोट्या व्यवसायांवरही मोठा फटका बसला. केंद्राच्या ग्रामविकास खात्यानुसार, रोहयोवर ३ वर्षांत ३० लाख लोक होते. नोटबंदीनंतरच्या ३ महिन्यांत हा आकडा ३० लाखांवरून  ८० लाखांवर गेला. यावरूनच नोटबंदीचा किती फटका  बसला हे लक्षात येते.

मुख्यमंत्र्यांची खिल्ली: ज्यांना अजून संपूर्ण महाराष्ट्र माहीत नाही, त्यांनी ‘हा माझा शब्द’ सांगणे हास्यास्पद
भाजपचे अनेक लोक खासगीत भेटले की सांगतात, आमच्या पक्षाला वाजपेयी व अाडवाणी यांच्यासारखे सर्वसमावेशक नेतृत्व लाभले. त्यांनी कधी मीपणा केला नाही. मात्र हल्ली भाजपत ‘मीपणा’वर जोर देऊन इतरांना विचारात न घेण्याची प्रवृत्ती वाढत आहे. केंद्रात व राज्यातही मीपणाचा जोर वाढला असून ही वृत्ती लोकशाहीला घातक आहे. ज्यांना अजून पूर्ण महाराष्ट्रही माहीत नाही अशा नेत्यांकडून राज्यातील जनतेला जाहिरातींमधून ‘हा माझा शब्द आहे,’ असे सांगणे हास्यास्पद आहे, अशी खिल्लीही पवारांनी उडवली.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, राज, उध्‍दव यांनी मुख्‍यमंत्र्यांवर केलेली टीका आणि मुख्‍यमंत्र्यांनी दिलेले उत्‍तर... 
 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...