आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Comment On Narendra Modi And Udhav Thackeray

नरेंद्र मोदींचा फुगा लवकरच फुटेल; शरद पवारांचे रालोआबाबत भाकीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सची जागा मोकळी राहिली पाहिजे,’ असे मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी मांडले. प्रत्येक शहरात मोकळ्या जागेची गरज असते. त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणीही मोकळी जागा राखणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या नावाचा राजकारणामध्ये सध्या सुरू असलेला उदोउदो म्हणजे एखाद्या फुग्याप्रमाणे असून तो फुटायला वेळ लागणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. राष्ट्रवादीचा सोमवारी वर्धापन दिन आहे. या निमित्ताने मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी पक्षातर्फे कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी केंद्रीय राजकारणापासून राज्यातील दुष्काळासारख्या विविध मुद्दय़ांवर भाष्य केले.

उद्धव नव्या कल्पना आणतील
रेसकोर्सच्या जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व थीम पार्क उभारण्याच्या शिवसेनेच्या मागणीला शरद पवार यांनी हास्यास्पद ठरवले. ‘शिवसेनेने आधी मुंबईतील इतर बागांचा विकास करावा’ असा सल्लाही पवारांनी दिला. उद्धव ठाकरे यांना परदेशात गेले की नव्या कल्पना सुचतात. सध्याही ते विदेशात आहेत. परत आले की आणखी काहीतरी नवीन कल्पना आणतील, असा टोलाही त्यांनी लगावला. रेसकोर्सची लीज वाढवायची का, या प्रश्नाला उत्तर देणे मात्र पवारांनी टाळले.

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून 2250 कोटींची मदत
मुख्यमंत्र्यांची स्तुती
दुष्काळी परिस्थितीमध्ये राज्य सरकारने चांगले काम केल्याचे सांगत पवार यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी चांगले सादरीकरण केले होते. केंद्राने निधी देण्यास नकार दिल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले. केंद्राने या वर्षी 2250 कोटी निधी दिला असल्याचेही पवार म्हणाले.

खेळात पुन्हा सक्रिय होणार
गेली अनेक वर्षे आपण खेळाशी संबंधित असून त्यात राजकारण मात्र आणले नाही, असे पवार म्हणाले. ‘आयपीएल’मध्ये झालेल्या फिक्सिंगबाबत मात्र त्यांनी बोलण्याचे टाळले. ‘आपण सध्या बीसीसीआयशी संलग्न नाही. भविष्यात एखाद्या खेळाशी संबंधित संघटनेशी आपण जोडले जाऊ शकतो,’ असे संकेतही त्यांनी दिले.

राजकारणातून निवृत्ती नाही
‘ ज्यांचे नाव जास्त चालते ते यशस्वी होत नाहीत. फुगा जेवढा फुगतो तेवढाच लवकर फुटतो,’ असा गेल्या 40 वर्षातील अनुभव आहे. आपण स्वत: निवडणूक लढवणार नाही, मात्र याचा अर्थ राजकारणातून निवृत्त होणार असा नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

तिसर्‍यांची सत्ता; शक्यच नाही
तिसरी आघाडी सत्तेवर येण्याची शक्यता फेटाळतानाच काँग्रेस किंवा भाजपच्या मदतीशिवाय सरकार स्थापणे कठीण असल्याचे पवार म्हणाले. राष्ट्रवादी केवळ 22 जागा लढवत असताना पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहू शकत नाही. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याचा मुद्दा काँग्रेसचा असल्याचे ते म्हणाले.

अन्न सुरक्षा विधेयकाला विरोध
अन्न सुरक्षा कायद्याला आपला पाठिंबा असून विधेयक आणण्यास मात्र विरोध आहे. लोकसभेत चर्चा करून थेट कायदाच आणावा. लोकसभेमध्ये चर्चा झाली तर चांगल्या सूचना येऊ शकतील, असे सांगतच विरोधकांचाही या कायद्याला विरोध नसल्याचा दावा पवारांनी केला.

दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडवण्याची कल्पना सुचली नाही : उद्धव
‘परदेशात गेल्यावर आम्हाला नवीन कल्पना सुचतात ते खरे आहे, पण दुष्काळग्रस्तांना पाणी देता येत नाही म्हणून कोरड्या धरणात मुतून दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडवण्याची कल्पना आम्हाला कधी सुचली नाही,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवार यांच्या टीकेचा समाचार घेतला.

ठाकरे म्हणाले की, आम्हाला चांगला विचार करण्याचा व महाराष्ट्राच्या हितासाठी या कल्पना राबवण्याचा वारसा लाभला आहे. आमच्या कल्पना या लोकहिताच्याच असतात. रेसकोर्सवरचा जुगार पाहून पवारांना ‘आयपीएल’ सुचले असावे. आम्हाला शेतकर्‍यांच्या जमिनीवर लवासा बांधण्याच्या कल्पना सुचत नाहीत. रेसकोर्सने खूप वष्रे घोडेबाजार पाहिला. आता त्या जागी सामान्यांना श्वास घेण्यासाठी मोकळी जागा राहू द्या, असेही ते म्हणाले.