आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Mocks BJP MP, Talks About His Own Tobacco Habit, Cancer

तंबाखू वाईटच, मी परिणाम भोगतोय...- शरद पवारांची जाहीर कबुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- मी पूर्वी गुटखा खात होतो. नंतर त्याचा त्रास झाला. खालचे वरचे सर्व दात काढून टाकावे लागले. त्यामुळे यातून बाहेर पडू शकलो. आम्ही अडाणी आहोत, परंतु तंबाखू दुष्परिणाच्या अनुभवातून गेलो आहोत, अशी जाहीर कबुली देत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी तंबाखूच्या दुष्परिणामांचा अभ्यास करणाऱ्या संबंधित समितीच्या अहवालाची संसदेत चिरफाड करू, असा इशारा दिला.

अहमदनगरमधील आमदार अरुण जगताप यांच्या निवासस्थानी रविवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. माजी मंत्री मधुकर पिचड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग आदी यावेळी उपस्थित होते. तंबाखूच्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या संसदीय समितीचे प्रमुख नगरचे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्यासह समितीच्या इतर सदस्यांनी तंबाखूमुळेच कर्करोग होतो, याबाबत भारतात अभ्यास झाला नसल्याचा सूर लावला आहे. त्याला प्रत्त्युत्तर देताना पवार यांनी स्वानुभव कथन करत चांगलाच समाचार घेतला. मी काही वैद्यकीय तज्ज्ञ नाही. वैद्यकीय शास्त्राबाबत नगरच्या लोकांना चांगलेच ज्ञान दिसते, असा टोला त्यांनी खासदार गांधी यांचे नाव घेता लगावला.
केंद्र सरकारच्या एकूण धोरणांवर मात्र थेट टीका टाळत पवार यांनी थोडी मवाळ भूमिका मांडली. केंद्राच्या प्राधान्यक्रमात शेती हा विषय कुठेही नाही. उद्योग, व्यापार, आंतरराष्ट्रीय संबंध हे महत्त्वाचे विषय आहेत. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीकडे त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. याची सुरुवात भूमी अधिग्रहणपासून झाली आहे. बंगळुरु येथे झालेल्या भाजपच्या अधिवेशनात या कायद्यात काही बदल केल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष बघितल्याशिवाय त्यावर बोलता येणार नाही, असे पवार म्हणाले.
आघाडी सरकारच्या काळात भूमी अधिग्रहण विधेयकाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचा अध्यक्ष म्हणून काम करताना शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन तरतुदी केल्या होत्या. मात्र, या सरकारने शेतकरी हिताच्या सर्व बाबी वगळल्या. राज्य सरकारने या कायद्याबाबत काढलेला अध्यादेश आणखी पुढचा आहे. शेतकरी, ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय सरकार खासगी उद्योगाला जमीन संपादित करून देऊ शकणार आहे. केंद्रातील मंत्री विविध विषयांतील तज्ज्ञ असले, तरी शेतीतील तज्ज्ञ त्यांच्याकडे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थ गृह खाते वगळता कोणत्याही मंत्र्यांची प्रशासनावर प्रभावी पकड नाही तशी त्यांची कुवतही नाही, अशी टीका पवार यांनी केली. उसाला किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी सरकारने साखर विकत घेऊन साठा करावा कारखान्यांना साखरेचे पैसे व्याज द्यावे. यंदा साखरेची निर्यातही झालेली नाही. सरकारच्या शेतीविरोधी धोरणाने ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात येत असल्याचे पवार यांनी सांगितले.