आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Holds Review Meeting On Drought With NCP Ministers

कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही - शरद पवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कोणतेही वाद टाळून तीव्र होत जाणार्‍या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी जास्तीत जास्त मदत करावी, तसेच कामामध्ये हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज कडक शब्दांत मंत्र्यांना सांगितले. निवडणुकाही जवळ येत असून लोकांसाठी जोमाने काम करावे, असा आदेश त्यांनी उपस्थितांना दिला.

पक्षाच्या सर्व मंत्र्यांबरोबर घेतलेल्या बैठकीमध्ये 15 जिल्ह्यांतील परिस्थितीचा शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी आढावा घेतला. दुष्काळावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असून त्यासाठी पाणलोट क्षेत्रामध्ये सुधारणा कराव्यात, असे मत पवार यांनी व्यक्त केले. केंद्राने जाहीर केलेले 1207 कोटी रुपयांचे पॅकेज काय आहे, याची तपशीलवार माहिती त्यांनी या वेळी सांगितली. तसेच दुष्काळासाठी केंद्र सरकारकडून आणखी काही निधी मिळू शकतो, असे संकेतही त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दारिद्रय़ रेषेखालील लोकांना मिळत असलेल्या दरानेच दुष्काळी भागातील लोकांना धान्य मिळावे म्हणून केंद्र काही मदत देऊ शकते का, असे विचारले. त्यावर पवार यांनी गरज कळवा, त्याप्रमाणे मदत देऊ, असे सांगितले. तसेच फळबागांना 60 हजार रुपये प्रतिहेक्टर नुकसानभरपाई देण्याबाबत या वेळी विचारण्यात आले. त्यावरही पवारांनी केंद्राने 30 हजार रुपये प्रतिहेक्टर मान्य केले असून 15 हजार रुपये राज्य सरकारने द्यावेत, अशी सूचना केली.

पवार-मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा
राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात शुक्रवारी रात्री मुंबईत बैठक झाली. दोनच दिवसांपूर्वी केंद्राने राज्यासाठी 1207 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाल्याचे समजते. तसेच आणखी काही निधी केंद्राकडून उपलब्ध होऊ शकतो का याचाही चाचपणी मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे केल्याचे समजते. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून तेथेही उपस्थित झालेल्या काही मुद्दय़ांची चर्चा यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झाली. मात्र दोन्ही नेत्यांकडून अधिकृत भाष्य करण्यात आले नाही.