आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोनदा मतदानाचे वक्तव्य विनोदाने, ती सभा राजकीय नव्हती- पवारांचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गावाकडे मतदान करा, बोटावरची शाई पुसा आणि मुंबईत येऊन पुन्हा मतदान करा, असा अजब सल्ला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी माथाडी कामगारांच्या मेळाव्यात दिल्याने ते चांगलेच अडचणीत आले आहेत. शरद पवारांच्या भाषणाची टेप निवडणूक आयोगाने मागवली आहे. त्यामुळे पवारांसह राष्ट्रवादी चांगलीच गोत्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, शरद पवारांनी दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मी केलेले वक्तव्य हे विनोदाने केलेले होते. तसेच ती राजकीय सभा नव्हती तर मेळावा होता असे स्पष्टीकरण पवारांनी आयोगाला दिले आहे.
आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून राष्ट्रवादी काँग्रेसची मान्यता रद्द करावी अशी मागणी केली आहे. आज दुपारी आम आदमी पक्षाचे मयांक गांधी मुंबईतील निवडणूक आयोगात जाऊन पवारांच्या भाषणाची टेप निवडणूक अधिका-यांकडे सादर केली. निवडणूक अधिकारी भाषण तपासून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवतील. यात पवारांचे वक्तव्य आक्षेपार्ह आढळल्यास आयोग नोटिसीसह कारवाई करू शकते. आता पवारांनी दिलेले स्पष्टीकरण आयोगाला योग्य वाटते का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पवारांची सारवासारव पण समाधानकारण खुलासा करू शकले नाहीत- पवारांनी एका मेळाव्यात हे वक्तव्य करताच वृत्तवाहिन्यांवर याबाबत गहजब सुरु झाला. याची माहिती मिळताच सायंकाळी एका कार्यक्रमात पवारांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दोनदा मतदानाबाबत बोललो, पण कार्यकर्त्यांची गंमत करण्याचा हेतू होता. सहज टिंगलीच्या सुरात गमतीने आपण तसे बोललो, परंतु माध्यमांनी त्याचा विपर्यास केला. तसेच हे मी मेळाव्यात बोललो आहे ती सभा नव्हती. पण वादंग पाहता मीच नव्हे, तर पक्षाच्या नेत्यांनीही बोलताना सजग राहिले पाहिजे, असे सांगत आपण दोनदा मतदान करण्यास सांगितले नाही असे स्पष्टीकरण दिले. मात्र, हे स्पष्टीकरण देतानाही शरद पवारांसारखे अनुभवी राजकारणी बॅकफूटवर होते. तसेच ते याबाबत समाधानकारक खुलासा देऊ शकले नाहीत. आता निवडणूक आयोग याबाबत काय भूमिका घेते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दोन दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आपण 2009 साली परळीत बोगस मतदान केल्याचे वक्तव्य केले होते. त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. एकंदरीतच राष्ट्रवादीचे नेते व खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवारही अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.
पुढे वाचा, किरीट सोमय्या, गोपीनाथ मुंडे आणि मयांक गांधी यांनी आयोगाकडे काय मागणी केली...