आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस आघाडी शरद पवार तोडणार? निम्म्या जागा मिळणार नसल्याने स्वबळाचा पर्याय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 144 जागा मिळाव्यात ही आपली मागणी कॉँग्रेस मान्य करणार नसल्याचा अंदाज आल्याने आता स्वबळावरच निवडणुका लढवण्याच्या निर्णयापर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आले आहेत, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
कोणत्याही परिस्थितीत पुन्हा राज्याच्या सत्तेत यायचेच, असा पवारांचा निर्धार आहे. स्वबळावर लढल्यास अधिक जागा मिळतील आणि त्यानंतर सत्तेसाठी कॉँग्रेससह कोणत्याही पक्षांशी वाटाघाटी करता येतील, असे डावपेच पवारांनी आखल्याचे सांगितले जाते. 2009 मध्ये कॉँग्रेसने लोकसभेच्या यशानुसार विधानसभेसाठी 174 जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. तेव्हा राष्ट्रवादीला 114 जागांवर समाधान मानावे लागले. पाच वर्षांनी परिस्थिती बदलली. आता लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे फक्त दोनस तर राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आलेत. त्यामुळे आताही लोकसभेतील कामगिरीनुसार जागावाटप व्हावे, असे राष्ट्रवादीला वाटते. पाच वर्षांपूर्वी 174 जागा लढवून काँग्रेसला 82 जागा, तर 114 पैकी राष्ट्रवादीला 62 जागांवर यश मिळाले होते.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे निर्णय राज्यात झिरपत नाहीत!
दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे निर्णय राज्यात झिरपत नसल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. शरद पवार व सोनिया गांधी चर्चा करून निर्णय घेतात, मात्र मुख्यमंत्री तसेच कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष त्याचा सोयीप्रमाणे निर्णयाचा अर्थ लावून अंमलबजावणी करतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावेळीही असेच झाले. यामुळे आता कॉँग्रेसवर विसंबून न राहता स्वबळ आजमावण्याच्या निर्णयापर्यंत पवार आले असल्याचे सांगितले जाते.

आघाडी तोडण्याची कारणे काय?
- कॉँग्रेससोबत गेल्यास 62 जागा राखणेही कठीण होईल, अशी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची भावना आहे.
- काँग्रेसविरोधी लाट आपल्या मुळावर येईल. त्यापेक्षा स्वतंत्रपणे लढणे कधीही सोयीस्कर असल्याचा पवारांचा विचार झाला आहे.
- आताच्या 82 आमदारांपैकी निम्म्या जागाही कॉँग्रेसला राखणे अशक्य असल्याचे राष्ट्रवादीने केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष सांगतो.
- काँग्रेसची सध्याची ढासळलेली स्थिती पाहता राज्यात त्यांना मागच्यासारखे यश मिळेल, असे राष्ट्रवादीला वाटत नाही.
- आघाडीच्या जागावाटपाच्या मर्यादेमुळे अनेक बड्या नेत्यांना तिकीट नाकारावे लागेल. हे नेते बंडखोरी करतील किंवा इतर पक्षात जातील, अशी भीती आहे. त्यामुळे स्वतंत्र लढून पक्षातील सर्वांनाच संधी देण्याचा पवारांचा मानस आहे.