आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक नेतृत्वाबरोबरच शरद पवारांची विजयाची पंचसूत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामूहिक नेतृत्वाखालीच लढेल, असे स्पष्ट करत शरद पवार यांनी एकीकडे अजित पवारांच्या स्वनेतृत्वाच्या स्वप्नांनाही सुरूंग लावला आणि दुसरीकडे उत्साही कार्यकर्त्यांनाही आवर घातला आहे. तसेच लोकसभेच्या पराभवानंतरही आपण जिंकू शकतो, असा विश्वास कार्यकर्त्यांना देत विजयाची पंचसूत्रीही मांडली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत खुद्द शरद पवारांनी स्वत:ला मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित करून नेतृत्व करावे, अशी मागणी दोनच दिवसांपूर्वी पक्षांच्या आढावा बैठकीत पुण्याच्या कार्यकर्त्यांनी केली होती. कार्यकर्त्यांनी केलेल्या या ‘अतिउत्साही’ मागणीला नकार देत शरद पवारांनी येत्या निवडणुकीत पक्ष सामूहिक नेतृत्वाखालीच निवडणुकीला सामोरा जाईल, असे स्पष्ट करत या अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घातला आहे. तसेच येत्या निवडणुकीत जिंकून आल्यावर आपण आपला नेता ठरवू असे सांगत पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवडणूकपूर्व स्वनेतृत्व घोषित करवून घेण्याच्या स्वप्नांनाही सुरूंग लावल्याचे स्पष्ट होत आहे. कारण काही दिवसांपूर्वी एका वर्तमान पत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी ‘आगामी निवडणुकीपूर्वी पक्षाचा नेता निवडावा,’अशी भूमिका मांडली होती. त्यालाच पवारांनी अप्रत्यक्षपणे छेद दिल्याचे बोलले जात आहे.

लोकसभेत भलेही आपला पराभव झाला असेल पण पराभवाच्या गर्तेतूनही आपण बाहेर पडू, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. तसेच त्यासाठी त्यांनी काही सूचना कार्यकर्ते आणि राज्य सरकारला केल्या आहेत. पराभवानंतर पक्षाने जी कारणमीमांसा केली त्यातून ज्या चुका आणि उणिवा समोर आल्या त्यावर काम करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. राज्यात विजेच्या भारनियमनाचा प्रश्न मोठा आहे.

वीज एलबीटीवर निर्णय घ्या
ज्या ठिकाणी वीज बिलांची थकबाकी आहे त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर भारनियमन होत आहे, हे जरी खरे असले तरी राज्यातल्या प्रत्येकाला वीज मिळेल यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पराभवाचे आणखी एक कारण म्हणजे एलबीटी लागू करण्याच्या धोरणामुळे नाराज झालेला व्यापारी वर्ग. या समाज घटकाच्या नाराजीचा फटका आपल्याला बसल्याने त्यांनी नाराजी दूर करण्यासाठी सरकारला वेगाने पावले उचलण्याची गरज आहे.

32 टक्के समाज आपल्यावर नाराज
अन्न सुरक्षेची योजना जरी चांगली असली तरी त्या माध्यमातून 68 टक्के जनतेचा फायदा होणार आहे. त्यामुळे उर्वरित 32 टक्के समाज आपल्यावर नाराज झालाय हे विसरता येणार नाही. त्यामुळे या उरलेल्या 32 टक्के लोकांसाठी सरकारने काहीतरी करणे गरजेचे आहे, असे सांगत पवारांनी ओबीसी शिष्यवृत्ती धोरणाच्या योग्य अंमलबजावणीकडे लक्ष देण्याच्या सूचनाही सरकारला केल्या. अर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला शिक्षण आणि रोजगारासाठी आरक्षण देण्याचा निर्णयही लवकरात लवकर करावा लागेल, असेही पवार म्हणाले.

धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण
धनगर आणि लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला सर्मथन देत त्यांना आरक्षण द्यावे. मात्र इतर समाज घटकांवर अन्याय नको अशी भूमिकाही त्यांनी मांडली. एकप्रकारे लोकसभा निवडणुकीतील पराभवाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी शरद पवारांनी विजयासाठीची पंचसूत्रीच वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मांडली.