आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्यमांत पैसे ओतून नरेंद्र मोदींचा प्रचार - शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा प्रचारसभेत मीडियावर तोफ डागली. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा प्रचार काही चॅनेल्स पैसे घेऊन करत आहेत. विशेष म्हणजे देशात कधी नव्हे तर प्रथमच मीडियामध्ये पैसे ओतून मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत, अशी खरमरीत टीका पवार यांनी गुरुवारी केली.

कल्याण- डोंबिवलीतील राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचार सभेत बोलताना पवारांनी मोदींवर संधान साधण्याची एकही संधी सोडली नाही. भारताचा इतिहास व भुगोल माहित नाही ते गुडघ्याला बाशिंग बांधून पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहतात, हे दुदैव. निवडणूक झाली नाही, बहुमत मिळाले नाही आणि पंतप्रधान झाले, असे थाटात मोदी बोलत आहेत आणि विशेष म्हणजे काही चॅनेल्स त्याला खतपाणी घालत आहेत, असे पवार म्हणाले.

देशाच्या आताच्या पंतप्रधानपदाची भाषणे दाखवली जात नाहीत. पण, पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची भाषणे मात्र सर्रास दाखवली जात आहेत. असे कधीच झाले नव्हते. याशिवाय आतापर्यंत कोणत्याही नेत्याने पंतप्रधान होण्यासाठी मते मागितली नव्हती. पण, यावेळी मोदींच्या नावावर मते मागितली जात आहेत, याकडेही पवारांनी लक्ष वेधले.

शिवसेना नेतृत्वाने आत्मपरीक्षण करावे
आनंद परांजपे शिवसेना सोडून गेले तेव्हा त्यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली. मात्र त्यांच्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे, गजानन बाबर, गणेश दूधगावकर, मोहन रावले, राहुल नार्वेकर असे खासदार, नेते पक्ष सोडून गेले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांच्या पक्षाबाबत मूलभूत विचार करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा टोलाही पवारांनी मारला.