आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Nationalist Congress, Lok Sabha Election

राष्‍ट्रवादीचे सत्तेसाठी काय पन..!, निवडणूक गणित सोडवण्‍यात पवार व्यस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कॉँग्रेसला कोंडीत पकडण्याची एकही संधी न सोडता दुसरीकडे मात्र त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगायची, असाच राष्‍ट्रवादी कॉँग्रेसचा स्थापनेपासूनचा प्रवास दिसून येतो. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणाचा पाया हाच मुळी सत्ताकारणावर उभा असल्याने ते सत्तेकरिता कधीही, कोणालाही जवळ करू शकतात किंवा दूर लोटू शकतात. म्हणूनच आगामी निवडणुकांच्या माध्यमातून आधी दिल्लीत आणि नंतर महाराष्‍ट्रात आपली चूल कशी मांडायची, याचे गणित पवार सध्या सोडवताना दिसत आहेत.


राष्‍ट्रवादी गेली 15 वर्षे राज्यात कॉँग्रेससोबत सत्तेवर आहे. अर्थ, ऊर्जा, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, गृह अशी मलईदार खाती राष्‍ट्रवादीने आग्रहपूर्वक आपल्याकडेच ठेवून घेतली. आज महाराष्‍ट्रात सर्वात श्रीमंतांचा पक्ष म्हणून या पक्षाकडे पाहिले जाते. जलसंपदा, ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम खात्यात हजारो कोटींचा प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चौकशी समित्या नेमल्या गेल्या, न्यायालयाचे दरवाजे ठोठावले गेले... पण यामधून निष्पन्न होताना काहीच दिसत नसल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या चेह-यावरची ‘दादा’गिरी आजही कायम आहे. निवडणुका जिंकायच्या कशा आणि त्यानंतर सत्तेची बेरीज कशी करायची, यात हा पक्ष माहिर असल्याचे दिसून येते. या पक्षावर अजित पवारांच्या ‘दादा’गिरीची छापही दिसून येते, मात्र शरद पवार समर्थक जुन्या नेत्यांना हे रुचत नाही. त्यामुळे राष्‍ट्रवादी जुन्या-नव्या नेत्यांमध्ये छुपा वाद आहे, तो अधूनमधून समोर येत असतो.


गढी टिकवण्यात माहीर
मुळात राष्‍ट्रवादी पक्षाला कोणताही ठोस विचार नसल्याचे दिसून येते. पक्षाचे बहुतेक नेते हे संस्थानिक झाले असून आपली गढी एनकेनप्रकारेण कशी सांभाळायची याचे नाडीतंत्र त्यांना अचूक उमगले आहे. अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, पद्मसिंह पाटील, गणेश नाईक, रामराजे नाईक निंबाळकर, उदयनराजे भोसले (हे मुळातच राजे असल्याने राष्‍ट्रवादीलाही मानत नाही, हा भाग अलहिदा), वसंत डावखरे, जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, मनोहर नाईक, राजेश टोपे, डॉ. विजयकुमार गावित हे सर्व आपापल्या गढ्या सांभाळत राज्यशकट हाकताना दिसतात.


जागा वाढवण्यावर लक्ष!
2009 मध्ये राष्‍ट्रवादीचे आठ खासदार निवडून आले होते. शरद पवार, संजय पाटील, संजीव नाईक, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, समीर भुजबळ, पद्मसिंह पाटील व प्रफुल्ल पटेल यांचा त्यात समावेश होता. आता शरद पवार राज्यसभेत गेल्याने त्यांच्या जागी माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यासह मावळ, कोल्हापूर, रावेर, जळगाव या जागाही खिशात टाकून किमान 12 खासदार जिंकून आणण्यासाठी राष्‍ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. खरे तर विविध सर्वेक्षणात राष्‍ट्रवादीचे खासदार आठहून कमी होतील, असे अंदाज व्यक्त झाले. मात्र, निवडणुका जवळ येताच चित्र बदलत असल्याचे दिसते.


‘मोदी लाटे’चा पवारांना अंदाज
सत्तेचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत, याचा वेध देशात सर्वात आधी शरद पवारांना येतो, असे म्हणतात. या निमित्ताने स्वत: शरद पवारांनीच सांगितलेला हा किस्सा आहे. लालबहादूर शास्त्री यांचे निधन झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी एकमताने पंतप्रधानपदासाठी यशवंतराव चव्हाण यांचे नाव सुचवले होते. मात्र, सुसंस्कृत राजकारणावर विश्वास असणा-या यशवंतरावांना त्याआधी इंदिरा गांधी यांचे मत जाणून घ्यायचे होते. त्या वेळी बैठकीला उपस्थित असलेल्या युवा शरद पवारांना मात्र ते मान्य नव्हते. पण ते न मानता यशवंतराव इंदिराबार्इंकडे गेले आणि ‘अर्ध्या तासात आपली पंतप्रधानपदी निवड झाल्याचा इंदिराजींकडून निरोप येईल,’ असे सांगत बैठकीत परतले. यावर लगेचच पवार म्हणाले, ‘उलट होणार बघा. आता इंदिराजींचा निरोप असेल की माझ्या पंतप्रधानाच्या उमेदवारीला यशवंतरावांनी पाठिंबा दिला आहे.’ आणि तसेच झाले. यशवंतरावांनी हातातोंडाशी आलेला घास गमावला. यानंतर पवार सत्तेसाठी कोणाची कधी वाट बघत बसले नाहीत. प्रसंगी वसंतदादा पाटील यांच्या विश्वासाला तडा देऊन त्यांनी पुलोदचा प्रयोग केला. त्यामुळे मोदींच्या लाटेवर स्वार होत एनडीए सत्तेत येण्याचे संकेत मिळत असतील तर पवार काँग्रेसबरोबरची चूल मोडण्यासाठी मागेपुढे पाहणार नाहीत. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी व नितीन गडकरी असे मित्र एनडीएमध्ये असल्याने पवारांना कोणी आडकाठी करण्याचाही प्रश्न येत नाही.


लोकसभेतील बलाबल
22 मतदारसंघात राष्‍ट्रवादी लढणार
08 मावळत्या लोकसभेत पक्षाचे खासदार
12 जागा मिळविण्याचे
शरद पवारांचे उद्दिष्ट
बालेकिल्ला असलेला पश्चिम महाराष्‍ट्र, मराठवाडा व विदर्भावर पक्षाची
संपूर्ण भिस्त


विरोधकांचे एकच लक्ष्य : राष्‍ट्रवादी
महायुतीच्या नेत्यांनी राष्‍ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर हल्ला करत राज्यातील वातावरण याआधीच ढवळून काढले आहे. उद्धव ठाकरे हे सातत्याने राष्‍ट्रवादीच्या मंत्र्यांचाच नव्हे, तर प्रसंगी शरद पवारांचा पंचनामा करताना दिसताना. विधिमंडळातही एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवताना सातत्याने राष्‍ट्रवादीलाच टार्गेट केले आहे. किरीट सोमय्या तर आठवड्याला एक पत्रकार परिषद घेऊन राष्‍ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे पाढे वाचत आहेत. कालपरवा राजकारणात आलेल्या आम आदमी पार्टीलाही हाती झाडू घेऊन महाराष्‍ट्रात आधी साफसफाई करायची आहे ती राष्‍ट्रवादीची. ‘आप’च्या नेत्या अंजली दमानिया यांनी अजित पवार, सुनील तटकरे यांच्या खात्यातील भ्रष्टाचाराचे जाहीर वाभाडे काढले आहेत.