मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना काँगे्रसबरोबर आघाडी नको आहे. दोघांनाही स्वबळावर निवडणूक लढवायची आहे. शनिवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची भूमिका स्वबळावर निवडणूक लढवण्याची असल्याचेही सांगितले. निर्धार मेळाव्यात
आपल्याला तसे स्पष्टपणे जाणवल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता काँगे्रससोबत आघाडी करणे योग्य ठरेल, अशी सामंजस्याची भूमिका शरद पवारांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बैठकीत अजितदादा व तटकरे यांनी निर्धार मेळाव्यात जिल्ह्यांमधील मुख्य पदाधिकाºयांची काय भावना आहे ते पवारांच्या कानावर घातले. तटकरे यांनी ही भावना तर बोलून दाखवलीच, पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे जागा वाटपही सन्मानाने करायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत आघाडी कशी होणार? राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही मतदारसंघांमधील स्थितीची कल्पना दिली, असे सूत्रांकडून समजते.
पवारांनी सर्व मंत्र्यांचे म्हणणे नीट ऐकून घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीत राज्यात आघाडीची झालेली वाताहत तसेच सध्या लोकांच्या मनात आघाडीबाबत काय मत आहे, हे समजावून सांगितले. आघाडीविरोधात लोकांमध्ये मत असताना काँग्रेस व राष्ट्रवादी वेगळे लढल्यास त्याचा मोठा फटका दोन्ही पक्षांना बसेल. दोन्ही पक्षांत आघाडी करूनच लढण्यात दोन्ही पक्षांचे हित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, असे सूत्रांनी सांगितले.