आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Vijaykumar Gavit, Divya Marathi

धडा शिकवण्‍यासाठी डॉ. गावितांच्या भावासाठी शरद पवारांकडून गळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकणा-या माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट गावित यांचे बंधू व समाजवादी पार्टीचे आमदार शरद गावित यांनाच राष्ट्रवादीत आणण्याचे ठरवले आहे. इतकेच नव्हे, तर निवडणुकीनंतर त्यांना महसूल राज्यमंत्रिपदही देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.


डॉ. हिना गावित यांचा भाजपप्रवेश व डॉ. गावित यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी शरद पवार यांना अपेक्षित होती. त्यामुळे त्यांनी आधीच चक्रे फिरवत विजयकुमारांचे भाऊ आमदार शरद गावित यांना समाजवादी पार्टीतून राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यासाठी गळ टाकला होता. तो यशस्वी झाला असून लवकर ते पक्षप्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


नंदुरबारमधील राजकीय घडामोडींचा अंदाज शरद पवारांना होता. त्यामुळे त्यांनी हिना यांना लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उभे करा, आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ, अशी सूचना विजयकुमारांना केली होती.मात्र, अपक्ष उभे राहिल्यास विजयाची खात्री नसल्याने विजयकुमारांनी पवारांची सूचना धुडकावून लावल्याचे सांगितले जाते.


अबू आझमींकडूनही दुजोरा
शरद गावित हे समाजवादी पार्टी सोडून चालले आहेत, याची कुणकुण प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांना लागली होती. मात्र, ते पार्टीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेत नव्हते. मात्र, राष्‍ट्रवादीत प्रवेश एकदा निश्चित झाल्यानंतर त्यांची समाजवादी पार्टीतून हकालपट्टी करण्यात येईल, असे आझमी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले.


सुरेश धस यांना प्रमोशन !
निवडणुकीनंतर कॅबिनेटमध्ये बदल केले जाणार असून विजयकुमार यांचे वैद्यकीय शिक्षणमंत्रिपद सुरेश धस यांना देण्यात येईल, तर धस यांच्याकडील महसूल राज्यमंत्रिपद शरद गावितांना दिले जाणार आहे. ही अदलाबदल करताना शरद पवारांनी पुढे असणा-या विधानसभा निवडणुकीची गणिते बांधली आहेत.