आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Not Opposing Foods Security Bill : Union Minister Manish Tiwari

अन्न सुरक्षा विधेयकाला शरद पवारांचा विरोध नाहीच : केंद्रीय मंत्री मनीष तिवारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अन्न सुरक्षा विधेयकाला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह यूपीएमधील सर्व घटक पक्षांची मान्यता असल्याचा दावा केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी शुक्रवारी केला. मंत्रिमंडळाच्या मान्यतेशिवाय विधेयक संसदेत मांडले जात नाही. त्यामुळे पवारांच्या विरोधाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले. मात्र, एवढे महत्त्वाचे विधेयक संसदेत मांडण्यास भाजपने आडकाठी केली असल्याची टीकाही तिवारी यांनी केली.


पत्रकारांशी बोलताना तिवारी म्हणाले की, सुरुवातीला शरद पवार यांनी अन्न सुरक्षा विधेयकाला विविध कारणांमुळे विरोध केला होता, मात्र नंतर त्यांनी आपली बाजू स्पष्ट करत यावर संसदेत चर्चेची मागणी केली. केवळ दारिद्र्य रेषेखालीलच नव्हे, तर दारिद्र्यरेषेवरीलही लोकांनाही या कायद्याचा फायदा होणार आहे.


कॅगच्या अहवालांचे दाखले देत भाजपने आतापर्यंत तीन संसदीय अधिवेशनांमध्ये काम होऊ न दिल्याबद्दल तिवारी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. मात्र, कॅगचा अहवाल हा अंतिम नसून त्याची चर्चा लोकलेखा समिती आणि संसदेत व्हावी लागते, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले. त्यामुळे कॅगच्या अहवालावरून भाजपने राजकारण केल्याचे आता उघड झाले असल्याची टीकाही त्यांनी केली.


मध्यावधी नाहीच
केंद्रामध्ये मध्यावधी निवडणुका होण्याची चर्चा त्यांनी या वेळी फेटाळून लावली. तसेच कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशाचे कौतुक करत तेथे पारदर्शी सरकार देण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.


महिला आयोगाबाबत चर्चा
राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद अनेक महिने रिक्त असल्याचे मनीष तिवारी यांनी या वेळी मान्य केले. महिलांच्या सुरक्षेचा दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण त्याबाबत राज्याच्या प्रभारींशी बोलू, असे ते म्हणाले. संजय दत्तचे प्रकरण न्यायालयाच्या कक्षेत असल्याने त्यावर बोलणार नसल्याचे ते म्हणाले.