आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवार पुन्हा रस्त्यावर!, दुष्काळी उपाययोजनांसाठी जेलभरोची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद / मुंबई- येत्या महिनाभरात दुष्काळी उपाययोजना करून सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही तर १४ सप्टेंबरपासून राज्यभर जनावरांसह जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. पवारांच्या नेतृत्वात शुक्रवारी उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या निमित्ताने तब्बल ३५ वर्षांनंतर पवार रस्त्यावर उतरले आहेत.
मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी शरद पवार तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले असून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात उस्मानाबादेतील मोर्चाने झाली. शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका, आत्महत्येची वेळ आणणाऱ्यांना जाब विचारा, अशी हाकही पवारांनी मोर्चाला संबोधित करताना दिली. पवार म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून उस्मानाबाद, लातूर,उर्वरित. पान १२
बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. शेतीची जबाबदारी असताना मी या भागाची पाहणी केली. दिल्लीमध्ये बसून निर्णय घेतले नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. गरीबांसाठी निर्णय घेतले. यावर्षीही शेतकऱ्यांवर संकट आले आहे. मात्र, सरकारला ते दिसत नाही. जनेतेने आम्हाला १५ वर्षे संधी दिली होती. यावेळी बदल केला. त्यामुळे विकासाची गाडी योग्य मार्गाने जाईल, असे वाटले होते. पण गाडी कुठे चालली, काेण चालवतेय, याचा पत्ता नाही. गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थिती होती त्यावेळी आम्ही चारा छावण्या सुरू केल्या होत्या.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार काहीही करायला तयार नाही.
तत्पूर्वी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, राहूल मोटे, जिल्हा परिषद सदस्या कांचनताई संगवे यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले. यावेळी माजीमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील, आमदार विक्रम काळे, गणेश दुधगावकर, अामदार विद्या चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, सुरेश बिराजदार, सुरेश देशमुख, रशिद काझी, सतीश दंडनाईक, राहूल पाटील सास्तूरकर, संपतराव डोके आदींची उपस्थिती होती. शहरातील लेडीज क्लब मैदानापासून मोर्चाची सुरुवात झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळामार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. नगर पालिकेसमोर मोर्चा आल्यानंतर शरद पवार मोर्चामध्ये सहभागी झाले. स्थानिक आमदार, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन िदले.

मरायचे नाही, अाता लढायचे!
मराठवाड्यात परिस्थिती भयावह आहे. आतापर्यंत ८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पण आपण मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाहीत, ज्यांनी आत्महत्येची वेळ आणली त्यांना आता जाब विचारू. आता स्वस्थ बसायचे नाही. प्रश्न सोडवा नाहीतर आम्हाला जनावरांसह आत घ्या, अशी मागणी आपण करायची, असे पवार म्हणाले.

१९८० नंतर पुन्हा आंदोलनाचा बिगुल
मराठवाड्यातील दुष्काळाच्या निमित्ताने शरद पवार ३५ वर्षांनंतर रस्त्यावर उतरले आहेत. यापूर्वी पवारांनी डिसेंबर १९८० मध्ये जळगाव ते नागपूर असा शेवटचा शेतकरी मार्च काढला होता.

पवारांचे शेतकरीप्रेम ढोंगी : शरद पवारांना शेतकरीप्रेमाचा उमाळा आला आहे. त्यांचा हा ढांेगीपणा आहे. उस्मानाबादला मोर्चा काढणाऱ्या राष्ट्रवादीने हा िजल्हाच भस्मसात केला. आधी िजल्हा बँक बंद पाडली, दूध संघ, साखर कारखाने व इतर सहकारी संस्था फुंकून टाकल्या. शेतकऱ्यांचा कणा मोडून झाल्यावर आता त्यांना शेतकऱ्यांची आठवण झाली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मोदींना ‘भाई-बहन’ दिसत नाहीत का?
पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीकास्त्र सोडले.संसदेचे अधिवेशन कालच संपले. अधिवेशन संपले म्हणजे सगळे संपले. २५ दिवसांच्या काळात महत्त्वाचे निर्णय झाले नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे होते, मात्र, कधी तास, अर्धा तास तर कधी दिवसभर सभागृह तहकूब होत होते. या काळात पंतप्रधान एकदाही सभागृहात आले नाहीत. त्यांना वेगळीच चिंता आहे. भगवे कपडे घालून प्रश्न सुटत नाहीत. मोदींना शेतकरी ‘भाई- बहन’ दिसत नाहीत का?, असा सवाल त्यांनी केला.