आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांचं भाषण अनुचितच, पण आता विषय संपवा- शरद पवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी दुपारी ठाण्यात एक प्रदीर्घ पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील मागील काही दिवसातील घडामोडींवर आपले मौन सोडले. अजित पवारांचं भाषण अनुचित व अयोग्य होते असे स्पष्ट करतानाच आता त्यांनी माफी मागितल्याने हा विषया संपवा, असे आवाहन माध्यमांना केले. तसेच अजित पवारांनी माफी मागितल्याचे पाहून आपल्याला बरं वाटलं, मात्र आपण टि्वटरवरुन माफी मागितली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्याबाबत माझ्याशी चर्चा झाली होती. माझ्या कार्यालयातून कोणीतरी ते टि्वट केले असावे, त्याबाबत माहिती घेणार असल्याचे सांगत अजित पवारांच्या राजीनाम्याचा निर्णय आमदार नव्हे पक्षातील प्रमुख नेते घेतील, असा घरचा आहेर दादानांही दिला.
पवार म्हणाले, माध्यमांनी एखादा विषय किती दिवस ताणून धरावा. मी पहिल्या दिवसापासून अजित पवारांचं वक्तव्य अयोग्य व अनुचित असल्याचे सांगत आहे. मात्र आता त्यांनी माफी मागितल्याने हा विषय माध्यमांनी संपावयाला हवा. विरोधी पक्षांनीही आता जनतेसाठी सभागृहाचे कामकाज चालू द्यावे, अशी विनंती पवारांनी विरोधी पक्षांना केली.
ठाण्यातील अनधिकृत बांधकामांबाबत बोलताना त्यांनी सर्वप्रथम राजकीय नेते व उच्चभ्रू लोकांची बांधकामे पाडा. त्यातून कोणतेही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही हा संदेश जाण्यासाठी प्रशासनाने हे काम केले पाहिजे. यात सामान्यांना व रहिवाशांना झळ बसता कामा नये. त्या काळात त्यांची राहण्याची सोय प्रशासन व सरकारने केली पाहिजे, असे सांगत माझ्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे बांधकाम असेल तरी पाडा, असे पवारांनी सांगितले.
उजनी धरण्यातून पाणी न सोडण्याबाबतची भूमिका मांडताना पवार म्हणाले, धरणात काही शिलकीचा साठा ठेवावा लागतो. जर पाऊस जून-जुलैपर्यंत लांबला तर लोकांना पाणी प्यायला द्यायचे कोठून, असा सवाल विचारला. कोर्टाच्या आदेशाने पाणी सोडल्याच्या प्रश्नावर छेडले असता पवार यांनी कोर्टालाही आपल्या शैलीत शालजोडे हाणले. पवार म्हणाले, पाणी सोडणे हे खरं तर प्रशासनाचे काम असते. पण ठीक आहे कोर्टाने सांगितले तर आपण त्यांचा सन्मान ठेवून पाणी सोडले पाहिजे. पण जर पाऊस लांबला आणि लोकांना पाणीही प्यायला मिळाले नाही तर आपण कोर्टाला विचारु की लोकांना आता पाणी कोठून द्यायचे?.
राज्य सरकारने व अजित पवारांनी शेतीचे पाणी उद्योगाला पळविले या आरोपाला उत्तर देताना पवार म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे व सरकारने मला दिलेल्या माहितीप्रमाणे ७३ टक्के पाणी शेतीलाच दिले आहे. तसेच केवळ २० टक्के पाणी पिण्यासाठी वापरले गेले आहे. फक्त ७-८ टक्के उद्योगांना दिले गेले आहे. जे पाणी उद्योगाला दिले आहे ते शासनाच्या धोरणानुसारच दिले आहे. कारण राज्यात औद्योगिककरण वाढावे यासाठी राज्य सरकारने उद्योगांना पूर्ण वेळ पाणी द्यायचे कबूल केले आहे. त्यामुळे याबाबत होत असलेले आरोप व माध्यमांत येत बातम्या पूर्णपणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले.
याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयातील सुमारे ३३ हजार विद्यार्थ्यांना आम्ही मदत करणार आहोत. त्यातील सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना सुमारे पाच कोटींची मदत आतापर्यंत दिली असून, उर्वरित जणांना येत्या दहा दिवसात मदत पोहचवली जाईल, अशीही माहिती पवार यांनी दिली.
केंद्र सरकारने लागू केलेल्या अन्न सुरक्षा कायद्याला माझा विरोध असल्याची जी चर्चा सुरु आहे, ती चुकीची असून, गरीब लोकांना दोन रुपये दराने गहू व तीन रुपये दराने तांदूळ देण्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. फक्त जो शेतकरी शेती करतो त्याचे अशा कमी भावामुळे व किमतीमुळे शेती करण्यावरुन मन उडू नये म्हणून काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.