आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Press Conference At Pune About The Farmers Issue & Cotton Rate

शेतक-यांच्या प्रश्नांवरून भाजप सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज, पवारांचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- यंदा कापसाचे हमीभाव हजार ते दीड हजार रूपयांनी राज्य सरकारने कमी केल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना भाजप सरकारने न्याय द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात केले. याचबरोबर ऊस उत्पादकांनाही रास्त दर देऊन न्याय देण्याची भूमिका घ्यावी, असे आव्हानही पवार यांनी केले. दरम्यान शेतमालाच्या दरावरून व शेतक-यांच्या प्रश्नांवरून भाजप सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचे संकेत पवारांनी दिले आहेत. शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत भूमिका मांडली.
 
शरद पवार म्हणाले, मागील एक-दोन वर्षाच्या तुलनेत यंदा कापसाचा हमीभाव सरकारने खूपच कमी जाहीर केला आहे. हा दर अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे. मागील काळात आमचे सरकार होते त्यापेक्षा हा दर सुमारे 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे. याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा. कापसाचे दर यंदा सरासरी हजार ते दीड हजार रूपयांनी उतरले आहेत. 2012 साली कापसाला प्रति क्विंटल 6 हजार तर, 2013 साली 5000 हमी भाव आमच्या सरकारने दिला होता. यंदा मात्र तो 3900 ते 4000 इतका खाली आणला आहे. कापूस फेडरेशनने कापूस खरेदी करणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सरकारने कापूस खरेदी करणे सुरु करावे. याचबरोबर नाफेडला अर्थसहाय्य करावे. साखरेचे दर यंदा खाली आले आहेत. असे असले तरी ऊस उत्पादकांना रास्त दर देऊन न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. नव्या सरकारने बाजार समित्या बरखास्त केल्या आहेत. त्याच्या निवडणुका लवकरात लवकर घेऊन लोकप्रतिनिधींच्या हाती बाजार समित्याचा कारभार सोपवावा असेही पवारांनी सांगितले.
 
पंतप्रधान मोदींच्या ग्राम योजनेंतर्गत एक गाव दत्तक घेण्याबाबत आम्हाला पत्र मिळाले आहे. त्यानुसार मी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील येनकुले गाव निवडले असल्याची माहिती दिली. याचबरोबर डीपी त्रिपाठी यांनी बारामतीतील मुर्टी हे गाव निवडले आहे. खासदार माजिद मेमन यांनी जुन्नर तालुक्यातील ठिकेकरवाडी गाव दत्तक घेतल्याची माहिती दिली. सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील गाव दत्तक घेतल्याची माहिती दिली.
 
 
काय काय म्हणाले शरद पवार, वाचा...
 
- सहकारमंत्री कोल्हापूरचे आहेत. कोल्हापूर शुगर बेल्ट आहे त्यामुळे या प्रश्नांची त्यांना नक्कीच जाण असेल
- राज्य आणि केंद्र सध्या एकाच पक्षाचे असल्याने राज्यातील नेतृत्त्वाने हा प्रश्न मार्गी लावावा
- कापूस व ऊस दराचा प्रश्न अतिशय संवेदनशील, परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे
- आघाडीने एलबीटीबाबत निर्णय घेण्यास विलंब लावला. आता राज्य सरकारने लवकर निर्णय घ्यावा
- डेंग्यूचे संकट दूर करण्यासाठी व त्याबाबत जनजागृती करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढे यावे.
- शिवसेना नेता भेटले मात्र वेगळ्या कारणांसाठी, राजकीय भूमिका किंवा कोणताही प्रस्ताव दिला नाही.
- आम्हाला कोणत्याही प्रस्तावास रस नाही.