आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप सरकार फसवे अाहे, मग सोबत राहता कशाला? उद्धव ठाकरेंना पवारांचा टीकावजा सल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराड- शिवसेना फसव्या लाेकांबरोबर  कशाला राहते,  हे समजत नाही. एकत्र नांदता येत  नसेल तर वेगळे व्हा, असा टीकावजा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. भाजप सरकार फसवे असल्याची टीका उद्वव यांनी नुकतीच केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना पवारांनी हा सल्ला दिला. दरम्यान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी समाधीचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली.


पवार म्हणाले, ‘भाजप सरकार फसवे आहे हे उद्धव ठाकरे म्हणतात हाच मोठा विनोद आहे. फसव्या लोकांबरोबर तुम्ही राहता कशाला?’  गुजरातमध्ये भाजपबद्दल नाराजी आहे. पण या निवडणुकीत गुजरातमध्ये सत्ता आणि पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल, असा दावा पवारांनी केला. सध्याचे सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणवत आहे. याला विरोध करण्यासाठी ३५ वकिलांची टीम सज्ज असल्याची माहितीही पवार यांनी या वेळी दिली.

 

 

यशवंतरावांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवताेय : सीएम
‘महाराष्ट्रात राहणारा जो सामान्य माणूस आहे त्या माणसासाठी यशवंतराव चव्हाणांनी जे स्वप्न पाहिले होते, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सध्याचे सरकार काम करत आहे. राजकारणाचा पुढाकार आणि पुरस्कार स्वर्गीय यशवंतरावांनी घेतला होता. शेतकऱ्याला आणि समाजातील वंचितांना न्याय देण्याचे काम आम्ही करू, हीच प्रेरणा मी येथून नेत आहे,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रीतिसंगमावर बोलताना सांगितले. 


हा तर वर्षातील सर्वात मोठा विनोद : शरद पवार
‘चव्हाण साहेबांना अभिप्रेत असलेल्या महाराष्ट्रासाठी हे सरकार काम करत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगणे हा या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे,’ असा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर लगावला.


उद्धवना स्पष्ट सांगितले, मी काँग्रेससोबतच राहणार...
सध्या विधान परिषदेची निवडणूक नारायण राणेंच्या संभाव्य उमेदवारीमुळे गाजते आहे. राणे यांना भाजपने उमेदवारी दिलीच तर काय करायचे, याची रणनीती सगळेच पक्ष आखत आहेत. उद्धव यांचा एक उमेदवार देण्याचा प्रस्ताव दिला असला तरी मी काँग्रेससोबत राहीन, असे पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.विधान परिषदेसाठी भाजपने नारायण राणे यांना उतरवले तर शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीसह छोट्या पक्षांनी एकच उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनीच दिला.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित आणखी माहिती व फोटोज...

बातम्या आणखी आहेत...