आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप सरकार पाडण्यास हातभार लावू, परंतु शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही: शरद पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यापेक्षा दिल्लीत माझे जास्त लक्ष असते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेबद्दल जे बोलतात त्यापेक्षा जास्त कटुता दिल्लीतील भाजप नेत्यांना शिवसेनेबद्दल आहे. लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी आणि शिवसेनेत सामंजस्य होते. अडवाणी बाळासाहेबांना भेटायला गेल्याचे अनेक वेळा पाहिले आहे. मात्र भाजपच्या दिल्लीतील आजच्या नेत्यांना शिवसेनेबद्दल टोकाचा द्वेष आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. एवढेच नव्हे तर सरकार पाडण्यास आम्ही हातभार लावू, परंतु शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही असे सांगण्यासही शरद पवार विसरले नाहीत.

उद्या हे सरकार पडेल अशी परिस्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रवादी हातभार लावेल. वसंतदादा पाटील यांचे सरकार पडले तेव्हा हे राज्य जावे ही श्रींची इच्छा, असा अग्रलेख छापण्यात आला होता. तशाच प्रकारे हे राज्य जावे ही श्रींची इच्छा, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे पवार म्हणाले. केंद्रातील भाजपच्या तीन नेत्यांना शिवसेनेत स्वारस्य नसल्यानेच  राज्यातील शिवसेना-भाजप युती तुटली आणि याला फक्त भाजपच जबाबदार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपमध्ये वितुष्ट निर्माण होईल आणि कदाचित मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागेल, असे भाष्य मी दीड वर्षापूर्वी केले होते. कालपर्यंत मी या मतावर ठाम होतो. मात्र उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जे वक्तव्य केले, त्यावरून शिवसेना सत्ता सोडेल असे मला वाटत नाही, असेही पवार म्हणाले. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना शरद पवार यांनी म्हटले, मुख्यमंत्री सभ्य, सुसंस्कृत व्यक्ती असल्याने त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा होती. त्यांना केंद्राचाही पाठिंबा आहे, ते परदेशात जाऊन तेथील परिस्थिती पाहून आले आहेत. मात्र त्यांनी अपेक्षाभंग केला. त्यांनी  सहकाऱ्यांबाबत केलेले वक्तव्य आक्षेपार्ह आहे. सहकाऱ्यातील कटुता वाढली की त्याचा प्रशासनावर परिणाम होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सामंजस्याची भूमिका घेणं आवश्यक असते. वादाच्या वेळी मुख्यमंत्र्यांची जास्त जबाबदारी असते. सामंजस्यासाठी काही गोष्टी गिळायच्या असतात, पण इथे मुख्यमंत्री स्वत:च आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. यशवंतरावांनी महाराष्ट्रात एक संस्कृती रुजवली होती त्याला त्यांनी छेद दिला असल्याची टीकाही त्यांनी केली.

विधानसभेत भाजपला जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे त्यांचा शिवसेनेकडे जास्त जागांचा आग्रह होता. मात्र गेल्या २५-३० वर्षांपासून शिवसेना मुंबईत नंबर एकचा पक्ष आहे. काहीही असले तरी आज भाजप त्यांचा क्रमांक एक घेऊ शकत नाही. शिवसेना सत्तेपर्यंत पोहोचणार नाही, पण सर्वाधिक जागांसह नंबर एक राहील, असा अंदाजही शरद पवार यांनी व्यक्त केला. भाजपने टोकाची भूमिका घेतली नसती तर इतके ताणले गेले नसते असेही भाजप-शिवसेनेतील वादाबाबत बोलताना म्हटले.

अगोदर भाजपला पाठिंबा दिला आणि आता पाठिंबा काढण्याबाबतच्या वक्तव्यावर बोलताना पवार म्हणाले, विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संख्याबळ नव्हते.  त्यावेळी आम्ही भाजपला पाठिंबा देऊ, असे मी बोललो होतो. मात्र ते वक्तव्य भाजप-शिवसेनेमध्ये सामंजस्य होऊ नये म्हणूनच केले होते. पण तरीही हे दोघेही सत्तेसाठी एकत्र येतील असेही वाटत होते आणि तसेच झाले.

मुख्यमंत्री  फडणवीस यांनी मुंबई आणि पाटण्याची तुलना केल्याबाबत प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, मुंबईचे प्रश्न आताचेच आहेत असे नाही, आमचे सरकार होते तेव्हाही प्रश्न होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी इतक्या टोकाचे बोलण्याची गरज नव्हती. केंद्राने मदत करणे अपेक्षित असते. निव्वळ एकाला दोष देणे गरजेचे नाही. ही जबाबदारी सामूदायिक आहे. मुंबईत देशातील लोक येतात. त्यामुळे मुंबईवरील ताण मोठा आहे. मुंबईचे प्रश्न सर्वांनी मिळून सोडवणे गरजेचे आहे असेही शरद पवार म्हणाले.

पवारांच्या बाेलण्याचा उलटा अर्थ घ्यावा : शेलार
राज्यात मध्यावधी निवडणुकांना सामाेरे जाण्यास राष्ट्रवादी तयार असल्याचे ट्विट शरद पवार यांनी साेमवारी रात्री केले हाेते. त्यावर उत्तर देताना भाजपचे मुंबई अध्यक्ष अामदार अाशिष शेलार यांनीही त्यावर ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘दूरदृष्टी असलेल्या जाणता राजाच्या भाकितांच्या नेहमी उलटा अर्थ घ्यावा, असे राजकीय विश्लेषक म्हणतात. म्हणूनच मध्यावधी निवडणूकांची राज्यात शक्यता नाही. सरकारला कोणताही धोका नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी नुकतेच स्पष्ट केले आहेच. तसा भाजपाला विश्वास आणि खात्रीही आहेच.’
बातम्या आणखी आहेत...