आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Sonia Gandhi Take Decision On Seat Sharing

मुदतपूर्व निवडणुकीचे पवारांचे भाकीत, 26-22 फॉर्म्युल्यावर राष्‍ट्रवादी कॉँग्रेस ठाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप आणि जागांच्या अदलाबदलीचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हेच घेतील, असे राष्‍ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत बुधवारी ठरले. काँग्रेसची 29-19 अशा जागावाटपाची मागणी असली तरी राष्‍ट्रवादीने 26-22वरच ठाम राहायचे ठरवले आहे. त्यामुळे हा तिढा दिल्लीत सोडवला जाईल.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी झालेल्या बैठकीस शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, बांधकाम मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर.आर. पाटील उपस्थित होते. दोन-अडीच तास ही चर्चा झाली. याआधीही या मुद्द्यावर पवारांनी सोनियांशी चर्चा केली होती. आताही तशीच होईल आणि एकत्र प्रचार लवकर सुरू करण्यात येईल, असे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

गेल्या वेळी काँग्रेस 26, तर राष्‍ट्रवादीला 22 जागा होत्या. तेव्हा काँग्रेसचे जास्त खासदार निवडून आले. त्यामुळे प्रमाणावर फेरविचार व्हावा अशी काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेसला तीन जास्तीच्या जागा हव्या आहेत. दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींशी बोलणे झाल्याचे सांगून राष्‍ट्रवादी 26-22 फॉर्म्यूल्यावर ठाम आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना हा फॉर्म्यूला मान्य नाही. त्यामुळे घोडे अडले आहे.


लवकर निवडणुका शक्य
आंध्र प्रदेशात तेलंगणाचा वाद सुरू असल्यामुळे लोकसभेच्या निवडणुका लवकर होऊ शकतात. त्यामुळे याविषयी लवकर निर्णय घेऊन प्रचाराला सुरुवात करावी, असेही राष्ट्रवादीच्या या बैठकीत ठरले. तसेच राज्यातील परिस्थितीचा आढावा या वेळी शरद पवार यांनी घेतल्याचे मलिक यांनी सांगितले.