आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित महाराष्ट्रात तर सुप्रिया केंद्रात- वारसदाराबाबत शरद पवारांचे संकेत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महाराष्ट्रात अजित चांगले काम करीत आहे. त्याची प्रशासनावर चांगली पकड आहे. तर सुप्रिया आंतरराष्ट्रीय संबंधांसह राष्ट्रीय प्रश्नांत रस घेत आहे. माझ्याबरोबर केंद्रात काम करणारे सर्व वरिष्ठ सहकारी तिच्या कामाचे कौतुक करतात, असे सांगत शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या आपल्या वारसदाराबाबत संकेत दिले.
स्टार माझा या मराठी वृत्तवाहिनीने शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. तिचा दुसरा भाग शनिवारी प्रसारित करण्यात आला. यावेळी राजीव खांडेकर व प्रताप आसबे यांनी पवार यांना तुमचा राजकीय वारसदार कोण? असा प्रश्न केला. त्यावेळी पवार यांनी मुलगी सुप्रिया किंवा पुतण्या अजित यांचे नाव न घेता सांगितले की, राष्ट्रवादीला सामूहिक नेतृत्त्वाचे गरज आहे. सामूहिक नेतृत्त्व असेल तर पक्षाची वाटचाल सुकर होईल.
अजित महाराष्ट्रात चांगले काम करीत आहे. राष्ट्रवादीतच नव्हे तर महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षमतेने राज्यकारभार करण्याची क्षमता अजितमध्ये आहे. त्याची प्रशासनावर चांगली पकड आहे. मी जेव्हा मुंबईतील वरिष्ठ अधिकारी व सचिव पातळीवरील अधिकारयांना भेटतो तेव्हा ते अजितच्या कामाच्या आवाक्याबाबत भरभरुन बोलतात. शिवाय तो लोकांचीही चांगली कामे करतो. अजित मुंबईत असला तरी सकाळी ६ वाजता त्याच्या कार्यालयात हजर असतो. सकाळपासून रात्रीपर्यंत तो रोज शेकडो लोकांना भेटतो. त्याच्या कामाची पद्धत चांगली आहे.
पण अजितमध्ये काही त्रुटी आहेत, त्यावर त्याने काम केले पाहिजे. अजितने आपले व्यक्तिमत्त्व बहुआयामी करायला हवे. त्यासाठी त्याने भरपूर वाचन करायला हवे. शिवाय माणसेही जोडली पाहिजेत. सर्वच माणसांची कामे करता येत नाहीत. पण ज्यांची कामे होणार नाहीत त्यांना दुखावणे योग्य ठरत नाही. महाराष्ट्र राज्य हे सुसंस्कृत व शिक्षितांचे राज्य आहे. त्यामुळे चांगल्या भाषेचा वापर करण्याबरोबरच आक्रमकपणा कमी करायला हवा, असा सल्लाही पुतण्या अजितला दिला आहे.
मुलगी सुप्रियाबाबत बोलताना पवार म्हणाले, सुप्रियाचे क्षेत्र व विचारही वेगळे आहेत. तिला समाजिक, शैक्षणिक, स्त्रीभृणहत्या, युवक , महिला आदी क्षेत्राबद्दल आस्था आहे. आंतरराष्ट्रीय संबंध, धोरण याबाबतही तिची स्वत:ची मते आहेत. आमच्या पक्षाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर जी काही भूमिका मांडली जाते त्यात सुप्रिया पुढे असते. त्यामुळे केंद्रातील माझ्याबरोबर काम करणारे सर्वच वरिष्ठ सहकारी तिचे कौतुक करतात.
पवारांनी या दोघांच्या कामाचे कौतुक करीत अजित महाराष्ट्रात काम करेल तर सुप्रिया केंद्रात काम करेल, असे अप्रत्यक्षरित्या संकेत दिले आहेत. सध्या महाराष्ट्रातील राजकीय घराण्यात वारसदारांवरुन मोठे राजकीय वाद रंगले आहेत. सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात राज ठाकरे यांनी बंड केले. त्यानंतर आता गोपीनाथ मुंडे यांच्या घरात वाद पेटला आहे. मुलगी पंकजा की पुतण्या धनंजय अशा दुहेरी पेचप्रसगांत अडकलेल्या मुंडे यांच्याविरोधात धनंजयने नुकतेच बंड केले आहे.
शरद पवार यांच्या राजकीय वारसदारांवरुन अजित व सुप्रिया यांच्यात मतभेद असल्याच्या काही वेळा बातम्या येतात. पण पवार कुटुंबियांनी आतापर्यंत त्याचा नेहमीच इन्कार केला आहे. राजकीय डावात तरबेज व राजकीय-सामाजिक परिस्थितीचे अचूक 'भान' असणारे शरद पवार अशी वेळ आपल्या घरात येणार नाही याची दक्षता घेत आहेत. त्यामुळेच पुतण्या डोईजड होत चालल्याचे लक्षात येताच अजित महाराष्ट्रात काम करेल तर सुप्रिया केंद्रात काम करेल, असे संकेत दिले आहेत. तर, राष्ट्रवादीला अस्तित्त्व ठेवायचे असेल तर पक्षाला सामूहिक नेतृत्त्वाची गरज असल्याचे ते स्पष्ट करतात.
दादांच्‍या आक्रमकतेला शरद पवारांकडून संयमाची वेसण