आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांनी घेतली पक्षनेत्यांची झाडाझडती, काँग्रेस वाढत असल्याने चिंतेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नगर पंचायती निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश नजरेत भरणारे आहे. राज्यात प्रमुख विरोधी पक्षाची जागा काँग्रेस घेत असताना राष्ट्रवादी मात्र मागे पडत असल्याने शरद पवारांची चिंता वाढली अाहे. राष्ट्रवादी पक्ष भाजपच्या जवळ आहे, अशी जनतेची भावना होत असून ती पक्षाच्या वाढीसाठी चिंताजनक आहे. हे सर्व पाहता पक्षाला लोकांचे प्रश्न घेऊन सरकारविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा संदेश पवारांनी बुधवारच्या बैठकीत पक्षनेत्यांना दिला. तसेच पक्षाच्या घसरत्या प्रतिमेबाबत झाडाझडतीही घेतली.

यशवंतराव चव्हाण सभागृहात पवारांनी आपल्या नेत्यांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला. खरे तर विधानसभा तसेच विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडत अाहेत; पण अजूनही लोकांच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेसला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवता आलेले नाही. सत्ताधाऱ्यांना पडद्याआडून मदत करणारा पक्ष, अशी आपली प्रतिमा झाली असेल तर ती पुसून टाकण्यासाठी पावले उचलायला हवीत. वर्षभरात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच काही महापालिकांच्या निवडणुका होणार असून यात दमदार कामगिरी करण्यासाठी लोकांच्या जीवन-मरणाचे प्रश्न घेऊन लढावे लागेल, याकडे पवारांनी लक्ष वेधले.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे िवरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार, गटनेते जयंत पाटील यांच्याकडून पक्षाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या नेत्यांनी पुढाकार घेतल्यास कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येईल. हिवाळी अधिवेशनात काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे त्यांचा मोर्चा यशस्वी झाला होता, हे विसरता कामा नये, असे पवार म्हणाले. विधान परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. सोलापूरची हातची जागा पक्षाला गमवावी लागली. याशिवाय मुंबईतही राष्ट्रवादीची मते फुटली, याविषयीचा जाब पवारांनी नेत्यांना विचारला.