आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Wrote A Letter To Cm Fadanvis Over Jitendra Awhad Attack In Sangali

जितेंद्र आव्हाड हल्लाप्रकरणी पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र! वाचा जसेच्या तसे..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना पत्र लिहून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचा अभिमान बाळगणा-या महाराष्ट्रात ही असहिष्णूता व झुंडशाही वाढत आहे ही बाब चिंताजनक आहे, अशी भीती व्यक्त केली आहे. आव्हाडांना येत असलेल्या धमक्यांबाबत मुख्यमंत्री या नात्याने तसेच गृह विभागाचे प्रमुख म्हणून आपल्याला जबाबदारी टाळता येणार नाही असे सांगत पवारांनी या पत्राद्वारे योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहनही केले आहे.
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, अलिकडे महाराष्ट्रामध्ये प्रागतिक विचार मांडणाऱ्या डॉ. दाभोलकर व कॉ. गोविन्द पानसरे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली व या हत्येला बराच कालावधी होऊनसुद्धा गुन्हेगारांचा शोध घेण्यात शासकीय यंत्रणेला यश आले नाही. एवढेच नव्हे तर प्रागतिक विचारांवर आधारित भूमिका मांडणाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेल्या पुरस्काराबद्दल विरोधी भूमिका मांडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना देण्यात येणाऱ्या धमक्या. आव्हाड यांच्या सांगली सभेमध्ये घुसून झालेला हल्ल्याचा प्रकार व त्या संदर्भात टेलिव्हिजनवर येऊन आव्हाड यांच्याबद्दल आमच्याकडून अशीच भूमिका घेतली जाईल, अशी जाहीरपणे दिलेली धमकी हे सर्व धक्कादायक आहे, असे पत्रात नमूद केले आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की, सार्वजनिक जीवनात काम करताना विविध विचाराचे मान्यवर आपण पाहतो. मतभिन्नता असणाऱ्यांनाही लोकशाहीमध्ये अधिकार आहे हे आपण स्वीकारणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांची आपण राज्य प्रमुख म्हणून नोंद घेऊन उचित खबरदारी घ्याल अशी अपेक्षा आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात काही अघटित घडू नये अशी आपली भूमिका असेल याबद्दल मला विश्वास आहे. त्याबरोबर या संदर्भातील राज्याचा गृह विभागाचा प्रमुख म्हणून आपणास जबाबदारी टाळता येणार नाही असेही पवारांनी फडणवीसांना ठणकावले आहे.
जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे ओ.बी.सी. समाजाचे लोकप्रिय व सुविद्य नेते आहेत. महाराष्ट्र शासनात मंत्री म्हणून त्यांनी कार्य तर केलेच, त्याचबरोबर महाराष्ट्र विधान सभेतील जागृत सदस्य म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांची नोंद राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून आपण व्यक्तिशः घ्याल असा मला विश्वास आहे. माझ्या या निवेदनाची आपणाकडून गंभीरपणे नोंद घेतली जाईल अशी अपेक्षा करतो. या पत्राची प्रत मी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या विरोधी पक्षनेत्यांना पाठवित आहे, असेही पवारांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.
पुढे वाचा, पवारांनी फडणवीसांना लिहलेले पत्र जसेच्या तसे...
तसेच वाचा, काय आहे जितेंद्र आव्हाड यांना धमकीचे प्रकरण....